Nitin Gadkari On Congress :  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) आपल्या सडेतोड, हजरजबाबी वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. शुक्रवारी गडकरींनी काँग्रेसमध्ये सामील होण्याबाबतचा एक किस्सा सांगितला. भाषणामध्ये बोलताना ते म्हणाले की, 'एका मोठ्या नेत्याने काँग्रेसमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला होता. त्यांना उत्तर देताना ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये (Congress) सामील होण्यापेक्षा विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करेल.'


काँग्रेसने 60 वर्षात केलेल्या कामाच्या तुलनेत भाजपने 9 वर्षात दुप्पट काम केलेय, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मोदी @९ महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. शुक्रवारी नितीन गडकरी भंडारा येथे बोलत होते. यावेळी भाजपमधील सुरुवातीच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला.. त्याशिवाय आतापर्यंतच्या प्रवासाबाबत व्यक्त झाले. 
 
गडकरींना कोणत्या नेत्याने दिला होता सल्ला - 






केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भंडाऱ्यातील भाषणादरम्यान काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकर यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत सांगितले. ते म्हणाले की, " जिचकर मला एकदा म्हणाले की तुम्ही खूप चांगले नेते आणि कार्यकर्ते आहात.  जर तुम्ही काँग्रेसमध्ये सामील व्हाल तर तुमचे भविष्य उज्ज्वल असेल. पण मी त्यांना म्हणालो की, काँग्रेसमध्ये सामील होण्याऐवजी विहिरीत उडी मारुन आत्महत्या करेल. कारण भाजप आणि त्यांच्या विचारधारेवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे भाजपसोबत काम सुरु ठेवणार आहे." 






पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक - 


यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरुन कौतुक केले. भारताचा इतिहास विसरुन चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताला आत्मनिर्भर करायचेय. देशाचा विकास करायचाय. भारताला जगातील आर्थिक महासत्ता करायचे आहे. त्यासाठीची ब्लू प्रिंट तयार आहे, असे म्हणत गडकरींनी मोदींचे कौतुक केलेय. यावेळी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले, ते म्हणाले की 60 वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेसने गरीबी हटाओ असा नारा दिला.. पण यामध्ये काँग्रेसने स्वत:चा लाभ केलाय.