Aditya Thackeray : मागील काही दिवसांपासून वेताळ टेकडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वेताळ टेकडी फोडून रस्ता कऱण्यात येणार आहे. त्याला अनेक पुणेकरांचा आणि राजकारण्यांचा विरोध आहे. त्यातच आता याच टेकडीची पाहणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी पुण्यातील वाहतुकीच्या समस्या आणि विविध विषयांवर भाष्य केलं. वाहतूक कमी करण्यासाठी मेट्रो आणली आणि आता वेगळा रस्ता कशासाठी करत आहात?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला सोबतच वेताळ टेकडी टिकली पाहिजे, असंही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी वेताळ टेकडीवर फेरफटका मारुन पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक पर्यापरण प्रेमी आणि वेताळ टेकडीवरुन जाणाऱ्या रस्त्याला विरोध करणारे पुणेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी वाहतूक कोंडी होते म्हणून पुण्यात मेट्रो आणली. मेट्रो आल्याने वाहतूक कमी होईल आणि वाहतूक कोंडी फुटेल असं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र मेट्रो आल्यावर आता या रस्त्याचा घाट कशासाठी घालत आहात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे बोलताना म्हणाले की, PMPML बसची सेवा कशी चांगली देता येई, मेट्रोने प्रवास कसा सुकर होईल हे पाहण्याची गरज आहे. भारताबाहेरील देशातदेखील अर्बनायझेशन केलं जातं मात्र त्यासाठी पर्यावरणाचा विचार केला जातो. शाश्वत विकास कसा केला जाईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
राज्यात विकासाच्या नावाखाही खेळ सुरु आहे. विकासाचा आणि स्थानिक नागरिकाचा विचार न करता लाठी काठी, दमदाटीने सर्व प्रकार सुरू आहे. आपल्यासाठी ते भयानक असल्याच सांगत शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी निशाणा साधला.
पुण्यात अनेक नवीन प्रोजेक्ट्सची कामं सुरु आहे. त्यातच नदी सुधार प्रकल्पाचादेखील समावेश आहे या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झाडं तोडण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा काही प्रमाणात या प्रकल्पालाही विरोध आहे. पर्यावरण प्रेमींनीदेखील विरोध केला आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की हा प्रकल्प सुरु होण्यापूर्वी एकही झाड तोडलं जाणार नाही, असं सांगण्यात आलं होतं मात्र आता किमात 6000 झाडं तोडण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं नुकसान होणार आहे, हे कसं रोखता येईल यावर सगळ्यांनीच विचार करायला हवा आणि तशा उपाययोजनादेखील करायला हव्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं.