पुणे: पुणे शहराच्या वाहनवाढीचा वेग राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे.


सुमारे 35 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात तब्बल 36 लाखांपेक्षा जास्त वाहने असल्याचं निष्पण्ण झालं आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी वाहनांची आकडेवारी जाहीर केली.

गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2017-18 या एका वर्षात पुण्यात 2 लाख 89 हजार 910 नवी वाहने दाखल झाली. यामध्ये 2 लाख 5 हजार दुचाकी आहेत.

लोकसंख्येपेक्षाही वाहनांची संख्या जास्त असल्याने, आधीच प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या पुण्याची अवस्था यापेक्षाही भयानक होण्याची चिन्हे आहेत.

पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.

शहरात वाहनांची संख्या वेगाने वाढत असल्याचं आरटीओच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. यात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे.

माणसांपेक्षा गाड्या जास्त

पुण्यात माणसांपेक्षा गाड्या जास्त, अशी परिस्थिती आहे. शहरात वाहनांची एकूण संख्या 36 लाख 27 हजार 280 वर गेली आहे.

दुसरीकडे महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहराची लोकसंख्या 35 लाख आहे.

परवान्यांमुळे रिक्षांची संख्या वाढली

गेल्या वर्षीपासून रिक्षाचे नवे परवाने खुले करण्यात आल्याने, पुण्यात रिक्षांची संख्याही वाढली आहे. 31 मार्चपर्यंत पुण्यात 45 हजार 5 रिक्षा होत्या, त्यात वाढ होऊन हा आकडा 53 हजार 227 वर पोहोचला आहे.

पुण्यातील वाहनांची संख्या

  • लोकसंख्या – 35 लाख

  • एकून वाहने – 36 लाख 27 हजार 280

  • टू व्हीलर – 27 लाख 3 हजार 147

  • रिक्षा - 53 हजार 227

  • 4 व्हीलर – 6 लाख 45 हजार 683

  • टॅक्सी कॅब – 28 हजार 344

  • ट्रक – 38 हजार 598