सोलापूर : सरकारने दुष्काळासंदर्भात जे काम केलं आहे, त्यासंबंधीची आकडेवारी मी सर्वांसमोर मांडतो. या आकडेवारी संदर्भात कोणीही चौकात चर्चा करायला बोलवलं तरी मी तयार आहे, मग ते जाणता राजा असो किंवा त्यांचा कोणी पंटर, असं म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. ते सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळ दौऱ्यात बोलत होते.
काही जण आपल्या राजकीय स्वार्थासाठी संभ्रम निर्माण करत आहेत. संभ्रम निर्माण करुन सामान्य माणसाला विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत सामान्यांना उभारी द्यायची असते, मात्र काही जण सामान्यांना विचलित करतात, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
लोकांमध्ये संभ्रम होऊ नये यासाठी मी ही आकडेवारी मांडतोय आणि या आकडेवारीची चौकात चर्चा करायला तयार आहे. मग या चर्चेसाठी जाणता राजाने यावं किंवा त्यांच्या कोणी पंटरने यावं, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी पवारांना खुलं आव्हान दिलं.
लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याचं मतदान संपताच महाराष्ट्रातील अनेक नेते दुष्काळ दौरे करत आहेत. शरद पवार यांनीही सांगोल्यात दुष्काळ पाहणी दौरा केला. दुष्काळ दौऱ्यात शरद पवारांनी शासनावर टीका केली. याच टीकांना प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलं.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज दुष्काळाची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी मोहोळ तालुक्यातील देवडी गावाला भेट देत दुष्काळाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शासनाने केलेल्या उपाय योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली.
यावेळी 1300 छावण्या सुरु झाल्या असून 8.5 लाख जनावरांचा चारा छावणीत आहे. तसेच धरणांच्या बॅकवॉटरवर 1 लाख एकर जमिनीवर चारा लावला, जो जूनपर्यंत पुरेल, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान शासन दुष्काळी परिस्थिती सामना करण्यासाठी सर्व शक्तीने प्रयत्न करत असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत 'जाणता राजा' किंवा त्यांच्या पंटरने चर्चेला यावं, चंद्रकांत पाटलांचं पवारांना खुलं आव्हान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 May 2019 04:46 PM (IST)
लोकांमध्ये संभ्रम होऊ नये यासाठी मी दुष्काळासंदर्भात उपाययोजनांची आकडेवारी मांडतोय आणि या आकडेवारीची चौकात चर्चा करायला तयार आहे, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -