Girish Mahajan on Aaditya Thackeray : राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Rain) कोसळत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटींग सुरु असल्याने मुंबई ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईच्या परिस्थितीला भाजप (BJP) सरकारची उदासीनता जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून भाजप सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महापालिकेवर नियंत्रण असलेल्या भाजप सरकारच्या पूर्णपणे उदासीन आणि निष्क्रीय भूमिकेमुळे आज मुंबई ठप्प झाली आहे. “मुंबईतील अशा भागांमध्ये पाणी साचले आहे जिथे याआधी कधीच पाणी साचले नव्हते. 2021-22 मध्ये आपण हिंदमाता परिसर पाणी साचण्यापासून मुक्त केला होता. मात्र, यंदा पुन्हा तिथे पाणी साचले आहे, कारण महापालिकेने योग्य वेळी पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरूच केली नाही,” असे त्यांनी म्हटले.
भाजपच्या उदासीनतेचा मुंबईला मोठा फटका : आदित्य ठाकरे
ते पुढे म्हणाले की, गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकीनाका परिसरात पाणी साचल्याचे दिसून आले. आता मात्र अशा अनेक भागांमध्ये हीच स्थिती पाहायला मिळते, जिथे भाजपच्या निष्क्रियतेचा थेट फटका सामान्य मुंबईकरांना बसत आहे. “मुंबईचा एवढा द्वेष भाजपला का आहे?” असा थेट सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, शहरातील अर्धवट रस्त्यांचे काम आणि नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळेच आज यापूर्वी कधीही पाणी न साचलेल्या ठिकाणी सुद्धा पाणी तुंबत आहे. भाजपच्या उदासीनतेचा मुंबईला मोठा फटका बसला आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
यावर राजकारण करू नका : गिरीश महाजन
याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, मुंबईत कुठेही ट्रॅफिक थांबलेली नाही. काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ट्रॅफिक थांबली आहे. इतक्या विक्रमी प्रमाणात काही तासात पाऊस झाल्याने हे होणारच आहे. तुमच्या ताब्यात इतकी वर्ष मुंबई होती, मग तुम्ही काय केले? त्यावेळी लोकांना किती सोसावे लागले. किती लोकांना जीव गमवावे लागले. किती गाड्या वाहून गेल्या, हे आपण बघितलेले आहे. त्यामुळे या गोष्टीचे राजकारण न करता मुंबईकरांना दिलासा कसा देता येईल? आपल्याला यातून मार्ग कसे काढता? येतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
नळावरच्या भांडणासारखं करू नका : गिरीश महाजन
2021-22 मध्ये आपण हिंदमाता परिसर पाणी साचण्यापासून मुक्त केला होता. मात्र, यंदा पुन्हा तिथे पाणी साचले आहे, कारण महापालिकेने योग्य वेळी पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरूच केली नाही, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, यश, अपयश हा विषय नाही. ही नैसर्गिक आपत्ती आहे. नळावरच्या भांडणासारखं करू नका. दहा गोष्टी आम्हालाही बोलता येतील, असे प्रत्युत्तर त्यांनी आदित्य ठाकरेंना दिले.
आणखी वाचा