Pune SPPU:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Sppu) आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठ यांच्यातर्फे राबवला जाणारा विज्ञान मिश्रशाखा अभ्यासक्रम (बीएस्सी. ब्लेंडेड) आता चार वर्षांचा करण्यात आला आहे. 2014- 2015 पासून सुरु झालेला हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा होता मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तो चार वर्षांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह मद्रास विद्यापीठ, गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट येथेही हा अभ्यासक्रम आता राबवला जातो. 


बी.एस.सी (ब्लेंडेड) BSC Blended या कोर्स मध्ये नेमका काय बदल?


2014-2015 पासून सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे यांनी मिळून अभ्यासक्रम तयार केला आणि बी.एस.सी (ब्लेंडेड) ही पदवी सुरु केली. ही पदवी मिळवण्यासाठी तीन वर्षांचा अभ्यासक्रम होता. यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून पदवी प्रदान करण्यात यायची आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नकडून गुणवत्ता हमी प्रमाणपत्र देण्यात यायचे. उच्च शिक्षण जागतिकीकरण या यूजीसीच्या धोरणांतर्गत ही पदवी सुरु करण्यात आली.


आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक पदवी ही चार वर्षांची होणार आहे. यामध्ये मल्टिपल एंट्री-एक्सिट हा पर्याय देखील असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नचा हा विज्ञान मिश्रशाखा अभ्यासक्रम (बीएस्सी. ब्लेंडेड) आता चार वर्षांचा करण्यात आला आहे. यामध्ये मुलांना 2 वर्ष भारतात तर 2 वर्ष मेलबर्नमध्ये जाऊन शिकता येणार असल्याचे विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्सेस’ प्रमुख डॉ. अविनाश कुंभार यांनी सांगितले.


मेलबर्नमध्ये जाऊन पदवी पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल?


"बीएस्सी. ब्लेंडेडचा विद्यार्थी 2 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथे शिकून डिप्लोमा प्राप्त करून त्यानंतर उरलेली 2 वर्षे विद्यार्थी मेलबर्नमध्ये पूर्ण करुन ड्युअल डिग्री प्राप्त करू शकतात. असा कोर्स उपलब्ध करुन देणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिले आहे", असं देखील डॉ. अविनाश कुंभार यांनी सांगितले.  


मेलबर्नमध्ये शिकताना विद्यार्थ्यांना कमावता देखील येणार


बीएस्सी. ब्लेंडेडची उरलेली दोन वर्षे पूर्ण करत असताना ऑस्ट्रेलियाकडून व्हिसा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीही मिळू शकतील. त्यामुळे स्वतःचा खर्च विद्यार्थ्यांना भागवता येणार आहे. या मुलांना व्हिसासाठी देखील प्राधान्य देण्यात येणार असून विद्यार्थ्यांचा क्षमतेवर त्याला ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून शिष्यवृत्ती-फेलोशिप देखील मिळू शकेल. त्यामुले विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा मार्ग खुला करुन देण्यात आला आहे असं म्हणायला हरकत नाही.