Sanjay Raut : कोणी कोणाच्या वाट्याला गेलं नाही. वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, असा टोला शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) काल त्यांच्या सभेत केलेल्या वक्तव्याला संजय राऊतांनी आज प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार किंवा मुख्यमंत्रीपद का गेलं हे साऱ्या जगाला माहित आहे. राज ठाकरेंना जर याबाबत माहित नसेल तर त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं असल्याचे राऊत म्हणाले.
Sanjay Raut on Raj Thackeray : ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना सांगायला नको
महाराष्ट्रातील सरकार हे फक्त ईडी सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर आणि जोडीला खोके याचा वापर करुन पाडण्यात आलं. ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना मी सांगायला नको असेही राऊत म्हणाले. त्याचा त्यांनी चांगला अनुभव घेतला असल्याचे राऊत म्हणाले. आमच्यासारख्या लोकांनी ईडीचा अनुभव घेऊनसुद्धा आमच्या पक्षाच्या तोफा आमि पक्षाचं कार्य सुरु असल्याचे राऊत म्हणाले. शिवसेनेनं कधीही हिंदुत्व सोडलं नव्हते आणि कधी सोडणारही नाही असे राऊत म्हणाले.
महाविकास आघाडी लोकसभा विधानसभा एकत्रित लढणार
कसब्याच्या पोटनिवडणुकीत मतदार कुठे गेला हे दिसलं आहे. काल रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितलं.
Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule : बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपची अधोगती सुरु
यावेळी संजय राऊतांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावरही टीका केली. बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या पक्षाची अधोगती सुरु आहे. ती अधोगती रोखण्याचा प्रयत्न ते करत असल्याची टीका राऊतांनी केली. विधानपरिषदेच्या सर्व जागा बावनकुळेंच्या नेतृत्त्वात लढल्या गेल्या. मात्र, तिथे त्यांच्या जागा पराभूत झाल्याचे राऊत म्हणाले. कसब्याची 30 वर्ष भाजपकडे असलेली जागा महाविकास आघाडीने जिंकली आहे. चिंचवडमध्ये बाजपला निसटता विजय मिळाल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं बावनकुळे यांच्या बोलण्यावर फार काही लक्ष देण्याची गरज नसल्याचे राऊतांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या: