पुणे : आर्टिफिशियल इंटेलिजन्समार्फत (AI) आता पुणे रेल्वे स्थानकावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक 'इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे' बसवण्यात येणार आहेत. AI कॅमेरे परिसरात संशयास्पद हालचालींवर नजर ठेवतील. संशयास्पद हालचाली आढळून आल्यास ते तात्काळ रेल्वे प्रशासनाला सतर्क करणार आहेत. आयओटी मार्फत ही सीस्टिम काम करणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही उपाययोजना करण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावर सुरुवातीला 30 दिवसांसाठी प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं आपल्या कामात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सुरुवात केली आहे. यासंदर्भात प्रत्येक विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. पुणे विभागाने असे सात आराखडे मुख्यालयात सादर केले होते. त्याच्या दक्षता यंत्रणेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
रेल्वे स्टेशनवर इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे बसवण्याचा हा प्रस्ताव असणार आहे. जिओ प्लॅटफॉर्मच्या जिओ थिंग्ज लिमिटेडने या कामाचे कंत्राट मिळवले आहे. डीआरएम इंदू राणी दुबे यांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. चार इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे एंट्री आणि एक्झिट गेट्स आणि तिकीट आरक्षण खिडक्यांवर बसवले जाणार आहेत.
शिवाय रेल्वे स्थानकाच्या परिसरात सध्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीमध्ये जिओ ब्रिजची उपकरणं देखील असतील. यामुळे प्रवाशांची नेमकी संख्या आणि ते रांगेत आहेत की नाही याची मोजणी करणे सोपं होणार आहे. त्यासोबतच संशयास्पद हालचाली, तिकिटांचा काळाबाजार आणि बेकायदेशीर रांगा हे कॅमेरे टिपतील. अशा प्रथांना आता आळा बसू शकतो, असं जनसंपर्क अधिकारी रामदास भिसे यांनी सांगितलं आहे.
नजर कशी ठेवण्यात येणार?
रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या कळेल. संशयास्पद हालचाली करणाऱ्या प्रवाशांचा माग काढला जाईल. तिकिटांचा काळाबाजार पकडला जाईल. अनधिकृत रांगा असू शकतात. इतर गैरप्रकार आढळून येऊ शकतात. पुणे रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ते त्याच्या परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवतील. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
मागील काही दिवसांपासून पुणे स्टेशनवर अनेक घटना घडल्या आहेत. अनेकदा बॉम्ब सदृष्य वस्तू सापडल्याचंदेखील निदर्शनास आलं आहे . त्यासोबतच काही दिवसांपूर्वी पुण्यात दहशतवादीदेखील सापडले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून AI मार्फत नजर ठेण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :