पुणे : पुणे-पानशेत रस्त्यावर टायर फुटल्याने कारचा ताबा सुटून गाडी खडकवासला (khadakwasla dam) धरणात पडल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना बुधवारी (30 ऑगस्ट) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या अपघातात एका अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. संस्कृती प्रदीप पवार असं बारा वर्षीय मुलीचं नाव आहे. ती पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड सीटीजवळ राहत होती. 


मुळशी आणि सिंहगड आपत्ती व्यवस्थापन समिती, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन रात्री उशिरा तिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड सीटी परिसरात राहणारे प्रदीप पवार हे रक्षाबंधन सोहळ्यासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न, मुलगी संस्कृती आणि बहीण सुनीता यांच्यासह कुटुंबासह मूळ गावी पानशेत येथे जात होते. त्यांची कार कुरुण बुद्रुक गावाजवळ माऊली मंदिराजवळ आली असता अचानक गाडीचा टायर फुटल्याने प्रदीप यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन धरणाच्या पाण्यात पडली.


अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रदीप पवार, अर्चना पवार, प्रद्युम्न पवार, सुनीता शिंदे हे बचावले पण संकृती गाडीतच अडकून राहिली. रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करुनही संस्कृतीचा मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात बचाव अधिकाऱ्यांना यश आले. रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे आणि पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वेल्हे पोलीस ठाण्यात स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


सुरक्षा सुविधा कधी उभारणार?


खडकवासला आणि पानशेत धरण परिसरात आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहे. सुरक्षेसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक जीव जात आहे. कोणतीही अनुचित घटना घडली तर धरणाचं अंतर शहरापासून दूर असल्यामुळे पोहोचायला परिणामी उशीर होतो. त्यामुळे अनेक घटनांमध्ये मृत्यू झाले आहेत, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. खडकवासला परिसरात अनेक ठिकाणी घातक क्षेत्र आहे. या सगळ्या क्षेत्रात योग्य संरक्षण भिंत किंवा फलक लावण्याची गरज आहे. अनेकांचा मृत्यू होऊनही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन किंवा इतर विभागामार्फत हे अपघात किंवा दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Nagpur Dengue Cases : डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाय करा आणि 6 सप्टेंबरपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करा : हायकोर्टाचे नागपूर महापालिकेला निर्देश