पुणे : सीरम इन्स्टिट्यूट आता डेंग्यू (Dengue) आणि मलेरियावर (Malaria) लस बनवणार असून डेंग्यूवरची लस वर्षभरात बाजारात येणार असल्याची घोषणा सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला (cyrus poonawalla) यांनी केली आहे. काल पुण्यातील एका खासगी कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता डेंग्यू आणि मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होणार आहे. 


देशात सध्या डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र यावर कोणताही रामबाण उपाय नाही. त्यामुळे अनेकदा नागरिकांची तब्येत खालावते परिणामी मृत्यूदेखील होतो. हीच बाब लक्षात घेत आता सीरम इन्स्टिट्यूट डेंग्यू आणि मलेरियावर लस बाजारात आणणार आहे. येत्या वर्षभरात डेंग्यूवरची लस बाजारात उपलब्ध होणार आहे तर मलेरियावरची लस बाजारात येण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे.


काय म्हणाले पुनावाला?


"कोविड लशीच्या यशानंतर आम्ही डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवणार आहे. या लसीची नितांत गरज आहे. आफ्रिक देशात आणि भारतात डेंग्यू आणि मलेरियाची साथ कायम येते. यावर उपाय आहेत मात्र ठोस अशी लस नाही त्यामुळे आम्ही ही लस तयार करणार आहोत," असं पुनावाला यांनी म्हटलं आहे. 


गर्भाशयावर परिणाम होणार नाही...


सायरस पुनावाला यांनी डेंग्यूची लस वर्षभरात आणणार असल्याची घोषणा केली. या लसीमुळे डेंग्यूचे चारही प्रकार बरे होण्याची खात्री असेल. सीरम इन्स्टिट्यूट लवकरच लस बाजारात आणण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. काही लसींमुळे महिलांच्या गर्भाशयावर परिणाम होतो. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशी ही लस असणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. 


शरद पवार दोनदा पंतप्रधान झाले असते : पुनावाला


यावेळी बोलताना सायरस पुनावाला यांनी राजकीय वक्तव्यही केलं. ते म्हणाले की, "शरद पवारांकडे दोनदा पंतप्रधान होण्याची संधी होती, पण त्यांनी त्या संधी गमावल्या. ते अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहेत. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची चांगली सेवा केली असती. पंरतु त्यांच्या हातातून संधी निघून गेली. आता जसं माझं वय वाढतंय तसचं त्यांचही वाढतंय, त्यामुळे त्यांनी आता निवृत्त व्हावं." शरद पवार यांनी सायरस पुनावाला यांची मैत्री सर्वांच्या परिचयाची आहे. त्यातच सायरस पुनावाला हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी दिलेला हा सल्ला शरद पवार किती गांभीर्याने घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


हिंडनबर्ग 2.0: अदानी पुन्हा अडचणीत? स्वत:चेच शेअर्स खरेदी केल्याचा आरोप; अदानी समूह म्हणतोय...