पुणे : पुण्याच्या पालक मंत्रीपदावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचा पुढचा अंक पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटलांनी पुणे जिल्ह्याच्या विकास कामांसाठी मागणी केलेला 450 कोटी रुपयांचा निधी अर्थमंत्री अजित पवारांनी रोखून धरल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांत पाटलांनी याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केल्यानंतरही त्याचा परिणाम झालेला नाही. त्यामुळं राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये कितीही गुळपीठ असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र दोघांमधे खटके उडताना दिसत आहेत.  


बेरकीपणा सोबत घेऊन सत्तेत सहभागी...


वर्षानुवर्षांचा मंत्रिपदाचा अनुभव आणि बेरकीपणा सोबत घेऊन अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. या बेरकीपणाचा अनुभव भाजपच्या नेत्यांना येऊ लागला आहे. चंद्रकांत पाटलांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून मंजूर केलेला साडेचारशे कोटी रुपयांचा निधी अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून रोखून धरला. चंद्रकांत पाटलांनी याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करूनही फरक पडत नसल्यानं गप्प बसण्याशिवाय चंद्रकांत पाटलांकडे पर्याय नाही. महायुतीतील नेतेही आज ना उद्या निधी मंजूर होईल, असं म्हणत वेळ मारून नेत आहेत. 


अजित पवारांनी 'तो' प्रस्ताव रोखून धरला


जून महिन्यात पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात अली होती. त्या बैठकीला राज्याचे विरोधीपक्षनेते आणि बारामतीचे आमदार म्हणून अजित पवार सहभागी झाले होते . या बैठकीत साडेचारशे कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. तो प्रस्ताव मान्यतेसाठी राज्याच्या अर्थविभागाकडे पाठवण्यात आला . तो मंजूर होण्याआधीच राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आणि अजित पवार राज्याचे अर्थमंत्री बनले . त्यानंतर अजित पवारांनी तो प्रस्ताव रोखून धरला आहे. मात्र महायुतीत सगळं काही आलबेल आहे. प्रशासकीय कारणांमुळे दिरंगाई होत असेल असं म्हणत नेते सारवासारव करत आहेत. 


धंगेकरांची उडी...


अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील या वादात कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर त्यांनी उडी घेतली आहे. आपल्या मतदारसंघाचा निधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या पर्वती मतदारसंघाकडे वळवल्याचा आरोप करत धंगेकरांनी चंद्रकांत पाटील जिथं दिसतील तिथं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


अजित पवार धडाधड बैठका घेतात...


मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पुण्यात बैठकांचा धडाका लावला. जिथे चंद्रकांत पाटील महिन्यातून एकदा बैठक घ्यायचे तिथे अजित पवार सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दर आठवड्याला बैठक घेताना दिसत आहे. त्यामुळं अजित दादाच पुण्याचे सुपर पालकमंत्री असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवारांना ही चर्चा आवडल्यानं ती करणाऱ्यांच्या तोंडात साखर पडो असं ते म्हणत आहे.


दादागिरी सहन करण्याशिवाय भाजपच्या स्थानिक नेत्यांना पर्याय नाही?
 


अजित दादांना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा जोरदार पाठिंबा आहे. लोकसभेला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी त्यांचा उपयोग होईल, असं भाजपच्या नेतृत्वाला वाटतं. त्यामुळं अजित पवारांची ही दादागिरी सहन करण्याशिवाय भाजपच्या स्थानिक नेत्यांना पर्याय नाही.  काँग्रेस सोबत पंधरा वर्ष सत्तेत सहभागी असलेले राष्ट्रवादीचे मंत्री आणि खासकरून अजित पवार शिरजोर झाल्याची तक्रार काँग्रेस नेते सतत करायचे. पण बारा गावचं पाणी प्यायलेले राष्ट्रवादीचे नेते त्या तक्रारींकडे लक्ष देत नव्हते. सरकार चालवायचं असेल तर राष्ट्रवादीची दादागिरी चालवून घेण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसायचा.  इथं तर दोन नाही तर तीन पक्षांचं सरकार आहे आणि लोकसभा निवडणुका नजीक आहेत . त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या तालावर मित्रपक्षांना कदम ताल करायला लावणार आहेत. 


इतर महत्वाची बातमी-