Pune political News : पुण्याच्या शिरूर लोकसभेसाठी भाजपकडून (Pune political News) आमदार महेश लांडगेंनी शड्डू ठोकले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेच पक्षाचे उमेदवार असतील, असं जाहीर केलं आहे. त्यानंतर लांडगे यांनी पक्षाने आदेश दिल्यास मी शिरूर लोकसभेची निवडणूक लढेन, असं जाहीरपणे सांगितलं आहे. सध्या शिवसेनेच्या कोट्यात ही जागा असली तरी भाजपचा या मतदारसंघावर डोळा आहे. त्यामुळेच अनेकदा केंद्रीय राज्यमंत्र्यांनी इथं दौरे केलेत आणि आता तर आमदार लांडगे यांनी लोकसभेच्या मैदानात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे शिरुर लोकसभेत राष्ट्रवादीनंतर आता भाजपचा उमेदवारांवर सगळ्याचं लक्ष लागलं आहे.


येत्या 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोठी तयारी सुरु आहे. शिरुर लोकसभेच्या जागेसंदर्भात बोलताना महेश लांडगे म्हणाले की, 2024 ला देशात भाजपचं सरकार येण्यासाठी आणि हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येण्यासाठी भाजपकडून मोठी तयारी सुरु आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वतोपरी तयारी करत आहे आणि दिलेली जबाबदारी पार पाडत आहे. 


ते पुढे बोलताना म्हणाले की, 2019 मध्ये शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत भाजप काम करत होतं. 2019 मध्ये शिरुर लोकसभा मतदार संघ महायुती असल्याने शिवसेनेकडे गेला होता. त्यावेळी शिवसेनेकडून आढळराव पाटील यांना महायुतीची उमेदवारी मिळाली. त्यावेळी आढळराव पाटलांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीचा उमेदवार निवडूण यावा यासाठी प्रयत्न करत होता. 


... तर मी निवडणूक लढवेन!


2019 मध्ये महेश लांडगे यांनी निवडणुकीची तयारी केली होती. त्यांनी जनसंपर्कदेखील वाढवला होता. त्यामुळे यावेळी  त्यांना पक्षाने आदेश दिला आणि शिरुर लोकसभेच्या जागेसाठी भाजपने लढण्य़ाची तयारी केली तर निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त  व्यक्त केली आहे. 


राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हेच उमेदवार!


शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी इच्छा व्यक्त केली होती. खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे या दोघांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीl पेच निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हा पेच सोडवला आणि लोकसभेत अमोल कोल्हे रिंगणात असणार असल्याचं पवारांनी घोषित केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून उमेदवार कोण असेल, हे स्पष्ट झाले आहे. मात्र जर भाजपने य़ा जागेवर निव़डणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर उमेदवारी कोणाला मिळेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे.