Pune PFI News : पुणे पोलिसांनी (Pune Police) कोंढवा परिसरातून पीएफआयच्या (Popular Front Of India- PFI)  सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. देशविरोधी घोषणाबाजी आणि एनआयएच्या (NIA) कारवाईच्या पार्श्वभूमीवर यांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. काल संध्याकाळपासून पुणे पोलिसांनी ही कारवाई सुरु केली होती. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या दोन (SDPI) आणि पीएफआयच्या चार जणांवर कारवाई केली आहे. अब्दुल बंसल (माजी SDPI अध्यक्ष), अयनुल मोमीन (PFI), काशीफ शेख (PFI सदस्य), दिलावर सैय्यद (SDPI), माज शेख, (PFI) मोहम्मद कैस (PFI) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या सहा जणांची नावं आहेत. 


दोन दिवसांपूर्वी एनआयएने कारवाई केली होती. त्यात पुण्यातील दोन पीएफआयच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. रझी अहमद खान आणि कयूम शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे होती. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ पीएफआय संघटनेने पोलिसांनी परवानगी नसताना आंदोलन केलं आणि या आंदोलनात पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. या घोषणाबाजीचा वाद राज्यभार पेटला होता. अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कोणती कारवाई होणार याबाबत अजून पोलिसांनी स्पष्टता दिली नाही. मात्र यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणखी काहींना ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओची फॉरेन्सिक तपास होणार असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटलं होतं. सोशल मीडियामधून जे व्हिडीओ उपलब्ध आहेत ते एकत्र करणार आहोत. या सगळ्या व्हिडीओचा फॉरेन्सिक तपास करणार आहोत. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली त्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये रस्ता अडवणे, बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, हिंसाचाराचा प्रयत्न आदींबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचा तपास करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. 


औरंगाबाद आणि सोलापूरमध्ये मोठी कारवाई 
दहशतवाद्यांशी संबंधित आरोपांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणानेने राज्यभरात मध्यरात्री एनआयएने छापेमारी सुरु केली आहे. औरंगाबाद आणि सोलापूरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना एटीएस आणि एनआयएने ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी झाली होती. जवळपास 100 जणांना अटक करण्यात आली होती. औरंगाबादमध्ये एटीएस आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत पीएफआयचे आज आणखी 13 ते 14 कार्यकर्ते ताब्यात घेतले. एकाच वेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.