पुणे : आरोग्य भरतीच्या 31 ऑकटोबरला झालेला  पेपर फुटीप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहेत. पेपर सेट करण्याची जबाबदारी असलेल्या डॉ. बोटलेंनी स्वतःच तो पेपर कसा फोडला आणि लातूरला आरोग्य विभागामध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी असलेल्या प्रशांत बडगिरेने त्याचा कसा बाजार मांडला. परंतु, पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलापर्यंत जावून पेपर फुटीच्या रॅकेटमधील सर्वांनाच बेड्या ठोकल्या आहेत. 


आरोग्य विभागाकडून 31 ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी सुरू असताना याच विभागातील अधिकारी या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीला लागले होते. एवढंच नाही तर पेपर फोडल्यानंतर तो कोणाला?,  कसा? आणि किती रुपयांना?, विकायचा याचीही आखणी करण्यात आली होती. खासगी क्लासेसच्या नावाखाली पेपर लीक करण्याचं रॅकेट चालवणारे अनेक एजंट या कटात सहभागी झाले होते. पण सगळं काही अवलंबून होतं ते राज्याचे आरोग्य सहसंचालक डॉ. महेश बोटले यांच्यावर. बोटलेंचा समावेश आरोग्य विभागाचा हा पेपर सेट करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीमध्ये होता. त्यामुळे त्यांना सेट करण्यात आलेला पेपरची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरं मुंबईतील आरोग्य संचालणालयाच्या ज्या कॉम्प्युटरमध्ये  ठेवण्यात आली होती त्या कम्प्युटरचा एक्सेस होता. त्याचाच गैरफायदा घेत त्याने हा पेपर फोडला. 


एकीकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आरोग्य विभागाच्या या परीक्षेची तयारी करत होते. त्यासाठी त्यांनी गेले कित्येक महिने अभ्यास केला होता तर दुसरीकडे याच आरोग्य विभागातील अधिकारी हा पेपर फोडण्याचा कट आखत होते. हा पेपर आपल्याला मिळणार आहे अशी बतावणी करून राज्यातील एक एजंट त्यांना सहभागी झाले होते. पण सगळं काही अवलंबून होतं ते राज्याचे आरोग्य सहसंचालक डॉ. महेश बोटले यांच्यावर. पेपर सेट करण्याची जबाबादारी असलेल्या महेश बोटलेंनी हा पेपर स्वतःच्या कॉम्युटरमध्ये सेव्ह करण्यात यश मिळवलं आणि पेपर फुटीला सुरुवात झाली. महेश बोटलेंनी 24 ऑकटोबरला हा पेपर स्वतःच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून त्याची माहिती लातूरला आरोग्य विभागाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणाऱ्या प्रशांत बडगिरेला दिली. कारण प्रशांत बडगिरे हाच इथून पुढे या पेपरचा बाजार मांडणार होता. 


लीक केलेला हा पेपर ई  मेल, व्हॉट्सअप किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन प्रकारे आणण्याऐवजी पेन ड्राइव्ह मार्फत स्वतःकडे आणायचं बडगिरेने ठरवलं. त्यासाठी 24 ऑक्टोबरला रात्री त्याने त्याचा चालक लातूरहून मुंबईला बोटलेंकडे पाठवला. हा चालक थेट बोटलेंच्या घरी पोहचला आणि त्यांनी दिलेला पेनड्राइव्ह घेऊन लातूरला निघाला. लातूरला हा पेनड्राइव्ह प्रशांत बडगिरने कॉम्युटरला जोडून ओपन केला आणि त्या पेपरमधील प्रश्न आणि उत्तरं हाताने कागदावर लिहून काढली. त्यानंतर हाताने लिहलेल्या या पेपरच्या प्रिंट काढण्यात आल्या आणि त्यांची विक्री करण्यास सुरुवात झाली.


प्रशान्त बडगिरेने त्यासाठी त्याच्याच खात्यातील डॉ. संदीप जोगदंडकडून दहा लाख रुपये तर शिपाई म्हणून काम करणाऱ्या शाम म्हस्केकडून पाच लाख रुपये घेतले. या दोघांनी पुढे हा पेपर खासगी क्लास चालकांमार्फत विद्यार्थ्यांना विकण्यास सुरुवात केली. पण आपलं बिंग फुटू नये म्हणून ही टोळी पुरेपूर खबरदारी घेत होती. त्यासाठी लातूरमधील काही खोल्या त्यांनी बुक केल्या होत्या. एव्हढंच नाही तर ज्या विद्यार्थ्याला हा पेपर हवा आहे त्या विद्यार्थ्यांच्या हातात ते हा पेपर देत नव्हते तर त्याला लॉजवर बोलावून त्याला हाताने लिहलेल्या पेपरची प्रिंट दोन तासासाठी वाचण्यास देत होते. लातूरबरोबरच त्यांनी आंबेजोगाईमधील लॉजवरूनही पेपरचा हा बाजार मांडायला सुरुवात केली होती. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात सहाय्यक आरोग्य अधीक्षक म्हणून काम करणारा राजेश सानप ही सहभागी झाला.
 
पण आंबेजोगाईला लॉजवर बसून हा पेपर वाचणाऱ्या खरमाडे नावाच्या विद्यार्थी या टोळीच्याही पुढचा निघाला आणि त्याने आंबेजोगाईच्या लॉजवर तो पेपर वाचता वाचता कॉपी केला आणि त्यानंतर या पेपरला आणखी पाय फुटले. दुसरीकडे प्रशांत बडगिरे हा पेपर विकण्यासाठी अधिकाधिक ग्राहक मिळवून त्याची विक्री करण्याच्या मागे लागला. लातूर आणि बीडमध्ये कार्यरत असताना या प्रशांत बडगिरेंची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून नर्स भारतीमध्येही त्याने पैसे खाल्ल्याचा आरोप त्याच्याच खात्यातील लोकांकडून केला होता.


प्रशांत बडगिरेंकडून पुढे हा पेपर वेगवगेळ्या एजंट मार्फत औरंबागाबाद, पुणे, कोल्हापूर, नाशिक, चाकण, बीड, लातूर, अशा राज्यातील वेगवगेळ्या शहरांमध्ये पोहचला आणि 31 ऑकटोबरला जेव्हा प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात झाली तेव्हा एकच गोंधळ उडाला. कारण परीक्षेच्या आधीच तो अनेकांकडे पोहोचल्याची चर्चा सुरु झाली. प्रामाणिकपणे ही परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांनी त्याचे पुरावे जमा करून ते पोलीस आणि आरोग्य विभागाला दिले. पण सुरुवातीला पेपर फुटलाच नाही असं म्हणणाऱ्या  पोलीस आणि आरोग्य विभागाला अखेर या प्रकरणाचा तपास सुरु करावा लागला. आता तपासातून पेपर फुटीचा हा प्रकार उघड झाला आहे. आरोग्य विभागाच्या सहसंचालकांपासून सुरु झेलली पेपर गळती पुढं झिरपत जाऊन सगळ्या राज्यभर पसरली. त्यामुळे पोलिसांनी इथून पुढे देखील असाच व्यापक पद्धतीने तपास करण्याची गरज आहे. तरच पेपर फुटीची कीड मुळापासून उखडली जाईल.


संबंधित बातम्या 


आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्ररणी विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले रडारवर, प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेला अटक