Yavatmal Crime News : लोहारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल घुगल यांना अमरावती ACB पथकानं एका प्रकरणात 7 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्यासह यवतमाळतील इतर दोन खासगी व्यक्तींना देखील अमरावती एसीबीच्या पथकानं अटक केली आहे.


अमरावती ACB ला तक्रार करणारा हा व्यक्ती यवतमाळ येथे अध्यात्मिक गुरू म्हणून वावरतो, त्याच्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. ही व्यक्ती सुनील नटराजन नायर उर्फ प्रेमासाई बाबा नावाने तो यवतमाळमध्ये  राहतो. राजकीय पक्षांतील अनेक दिग्गज व्यक्तींशी ओळख असल्याचं प्रेमासाई सांगतो. सन 2018 साली भाजपच्या खासदार मेनका गांधीसुध्दा त्या प्रेमासाई बाबाला मानतात. त्यासुध्दा प्रेमासाईच्या भेटीला यवतमाळला आल्या होत्या. तसेच 2019 च्या लोकसभेसाठी त्याला भाजपकडून विचारणा झाली, असं प्रेमासाई बाबा यानं त्यावेळी म्हटलं होतं. त्यांच्यावर नागपूर, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यातसुद्धा फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.  


प्रेमासाई बाबावर लोहारा पोलीस स्टेशनमध्ये 15 नोव्हेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल केला आहे. हैदराबाद येथील मोबाईल व्यवसायिक रोहित सिंह याला प्रेमासाई बाबा यानं तुझे पैसे काळी जादू करून डबल करून देतो, म्हणून 10 लाख 50 हजारानं फसवले आहे. त्यावरून सुनील नायर उर्फ प्रेमासाई बाबा विरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. याच प्रकरणी त्याला कोर्टातून 23 नोव्हेंबर 2021 रोजी तात्पुरता जामीन मिळाला आहे. त्याच प्रकरणात त्याला कायमस्वरूपी जामीन मिळवा म्हणून प्रेमासाई याने कोर्टात अर्ज केला आहे.


फसवणूक प्रकरणात कायम स्वरूपी जामीन होण्यास मदत होईल असे सांगत लोहारा ठाणेदार अनिल घुगल यांनी 10 लाखाच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर प्रेमासाई याने या संदर्भात अमरावती ACB पथकाकडे तक्रार दाखल केली त्यानंतर अमरावती एसीबीच्या पथकाने प्रकरणाची पडताळणी केली आणि 10 लाखांची लाचेची रक्कम तडजोडीअंती 7 लाख झाली तीच रक्कम 7 लाखाची लाचेची रक्कम यवतमाळच्या स्टेट बँक चौकात विदुत वासानी यांच्या डॉलर मोबाईल शॉपमध्ये आणून देण्यास सांगितले. त्यावेळी अमरावती ACB पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली.