European Couple Driving A Rickshaw: रिक्षातून प्रवास (Rickshaw) करणं हे नवीन नाही पण भारतभर रिक्षातून फिरणं हे काही नवीन आहे. मात्र भारतीय नाही तर एक युरोपियन जोडप्यानं भारत दौरा करायचं ठरवलं आहे.  एका ट्रॅव्हल कंपनीने आयोजित केलेल्या 'रिक्षा रन इंडिया' यात त्यांनी सहभाग घेतला आहे. मात्र हा दौरा करताना ते भारताची संस्कृती आणि भारतातील विविध पर्यटन स्थळं बघत त्या स्थळांची माहिती घेत हे जोडपं प्रवास करत आहे. त्यांची ही खास  'टुकटुकासो' रिक्षातून हा सगळा प्रवास सुरु आहे. रिक्षाचं अनोखं रुप अनेकांना आकर्षित करत आहेत. 


फ्रान्सची मुबेरा आणि गौतेमालाचा झेव्हिअर हे स्पेनचे रहिवासी आहे. हे पर्यटन प्रेमी डिसेंबर महिन्यात भारतात आले आणि त्यांनी त्यांच्या अनोख्या रिक्षातून प्रवासाला सुरुवात केली. जैसलमेर ते कोची असा प्रवास त्यांना 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचा आहे. पण हे करताना त्यांनी भारताची संस्कृती जाणून घ्यायचं ठरवलं आहे.


कधी रिक्षा बंद पडली तर कधी धक्का मारला...


टुकटुकासो या त्यांच्या रिक्षाला त्यांनी सजवलं देखील आहे. त्यांच्या रिक्षावर काढलेली ही चित्र 'पिकासो' या स्पॅनिश चित्रकाराच्या कामावर आणि क्युबिझमवर आधारित आहे. मुबेरा हिने स्वतः रिक्षा डिझाईन केली आहे. यावर दिसणारी चित्र तिने एका भारतीय कलाकाराकडून काढून घेतली. या टुकटुकासो मधून प्रवास करताना त्यांना अनेक अडचणी देखील आल्या, कधी रिक्षा बंद पडली तर कधी धक्का मारत रिक्षा पुढे घेऊन जावी लागली पण यामध्ये त्यांना अनेक भारतीयांची, रिक्षा चालकांची मदत मिळाली, असं ते दोघे सांगतात. महाराष्ट्रात ते पुण्यात थांबले होते आणि पुढे वाई, महाबळेश्वर आणि कोल्हापूर असा प्रवास त्यांनी केला! आता कोल्हापूरहून ते पुढे हंपीला जाणार आहेत आणि दक्षिण भारत फिरणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. 


'वसुधैव कुटुंबकम्' ही भारताची संस्कृती


असे हे मुबेरा आणि झेव्हिअर 15 तारखेपर्यंत कोचीमध्ये पोहोचतील आणि त्यांचा प्रवास पूर्ण करतील. भारताबद्दलचं प्रेम, इथले भेटलेले लोक आणि आलेले अनुभव कायम त्यांच्या लक्षात राहतील, प्रवास संपल्यावर टूकटूकासो मधून प्रवास कारणं, ती चालवत भारतभर फिरणं हे ते नक्कीच मिस करणार आहेत, असं ते सांगतात. वसुधैव कुटुंबकम् ही भारताची संस्कृती आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा उत्तम पाहूणचार आणि स्वागत भारतीय नेहमीच करत असतात. या जोडप्यानेही भारत आवडला असल्याचं सांगितलं आहे.