पुणे :  पुणे जिल्ह्याच्या इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, श्री मार्लेश्वर देवस्थान या क्षेत्रांना ऐतिहासिक, आध्यात्मिक, पुरातत्वीय वारसा आहे. याक्षेत्रांचा विकास करताना पुरातत्वीय महत्वं, ऐतिहासिक सौंदर्य जपण्यात यावं. नवीन बांधकाम करताना ते शेकडो वर्षांपूर्वीच्या मूळ वास्तूशी मिळतं-जुळतं असावं, अशा सूचना देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या आहेत.  


इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनक्षेत्रांचा परिपूर्ण आराखडा सबंधित जिल्हाधिकारी यांनी तयार करून सादर करण्याचे निर्देश देखील दिले आहे. या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करण्यात येईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यानी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिला. 


प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत  पुणे जिल्ह्याच्या इंदापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे, देवस्थाने आणि पर्यटनक्षेत्रांच्या विकासासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.


प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा


अजित पवार म्हणाले की, इंदापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन करुन जुने बुरुज, गाव वेसेसह ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याबरोबरच गढीलगत असणाऱ्या हजरत चाँदशाहवली बाबांच्या दर्गा परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात येईल. ही विकासकामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याची खबरदारी घ्यावी. 


पुरातत्व महत्व जपले जावे..


विकासकामे करताना त्या परिसराचा, वास्तूचा ऐतिहासिक, पुरातत्व महत्व जपले जावे, याची काळजी घ्यावी. गढीच्या परिसरात अतिक्रमणे असल्यास ती तातडीने हटविण्याची कारवाई करण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केली. त्यासोबतच कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या परिसरात रोजगार निर्मिती करण्यास मोठा वाव आहे. त्याचा विचार करुनच कोकणातल्या पर्यटनस्थळांचा विकास करावा. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्यातील पेढे येथील सवतसडा धबधबा, चिपळूण गुहागर बायपास रोडवरील पुरातन बौद्ध लेणी (दगोबाची लेणी) सुशोभीकरण करणे, संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवस्थान परिसर, कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, श्री टिकलेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे आर्च ब्रिज बांधणे, सुशोभीकरण करणे ही कामे करण्याबाबत वास्तुविशारदांची नेमणूक करण्यात यावी. पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या :


Supriya Sule : ऑगस्ट महिना कोरडा, दुष्काळ जाहीर करण्याचा गांभीर्याने विचार करा घ्या; सुप्रिया सुळेंचा सरकारला सल्ला