Pune News :  मुस्लीम महिलांना मशिदीत जाऊन नमाज पठण करता यावं, यासाठी पुण्यातील एका जोडप्याने मागील वर्षी रमजान महिन्यात लढा सुरु केला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या लढ्याची दखल घेत मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाला मशिदींमध्ये महिलांना नमाज पठणाचा अधिकार असल्याच मान्य करावं लागलं. यामुळे मागील रमजान महिन्यात जिथे महिलांन मज्जाव होता त्याच मशिदीत या रमजान महिन्यात मुस्लीम महिला नमाज पठण करताना दिसत आहेत. देशभरातील सगळ्या महिलांनाही मशिदीत (Masjid) जाऊन नमाज पठण करु द्या, अशी मागणी पुण्यातील एका जोडप्याने केली आहे.


पुण्याच्या बोपोडी भागातील या मशिदीतून मुस्लीम महिलांना नमाज पठणाचा अधिकार मिळावा यासाठी संघर्ष सुरु झाला. मागील वर्षी याच रमजान महिन्यात अन्वर शेख आणि त्यांची पत्नी फरहान शेख यांनी बोपोडीतील मशिदीत महिलांना नमाज पठणाची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी त्या मागणीला नकार देण्यात आला होता. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि देश पातळीवर पोहोचलं. मात्र आता वर्षभरानंतर या मशिदीत मुस्लीम महिलांना नमाज पठणाची परवानगी देण्यात आली आहे. या बदलाबाबत या मुस्लीम महिला समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. 


मागील वर्षी रमजानच्या खरेदीसाठी हे जोडपं पुणे कॅम्प भागात गेलं होतं. मात्र नमाज अदा करण्याची वेळ जवळ आल्यावर फक्त अन्वर शेख यांना मशिदीत प्रवेश देण्यात आला. फरहान यांना मात्र बाहेर पावसात भिजत उभं राहावं लागलं. त्यानंतर या जोडप्याने ते राहात असलेल्या या बोपोडीतील मशिदीच्या व्यवस्थापनाकडे महिलांना मशिदीत प्रवेश देण्याची मागणी केली. मात्र त्याला नकार देण्यात आल्याने या जोडप्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 


देशातील सर्व मशिदींमधे महिलांना प्रवेश दिला जावा!


त्यावर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाला मुस्लीम महिलांन मशिदीत जाऊन नमाज पठण करण्याचा पुरुषांइतकाच अधिकार असल्याचं मान्य करावं लागलं. त्यानंतर बोपोडीतील मशिदीचे दरवाजेही महिलांसाठी उघडण्यात आले. या मशिदीत महिलांना नमाज पठण करता यावं यासाठी वेगळी सोय करण्यात आली आहे. मशिदीच्या व्यवस्थापनाने हा बदल स्वीकारला आहे. मशिदीत प्रवेश मिळाल्याचा या मुस्लीम महिलांना आनंद तर आहेच पण देशातील सर्व मशिदींमधे महिलांन असाच प्रवेश दिला जावा, असं या महिला बोलून दाखवलं आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष...


मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडून सर्वोच्च न्यायालयात लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याने हा बदल पाहायला मिळत आहे. मात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणं अजून बाकी आहे. तो निकालही महिलांच्या बाजूने येईल आणि देशातील मशिदींमधे मुस्लीम महिलांना मुक्त प्रवेश मिळेल, अशी या महिलांची अपेक्षा आहे.