Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान असता कामा नये असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी चंद्रकांत पाटलांचा (Chandrakant Patil) राजीनामा घ्यावा असेही संजय राऊत म्हणाले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पलटी मारण्यालाही मर्यादा आहेत असं म्हणत राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली. 


बाळासाहेबांचा अपमान करणारे आजही तुमच्यासोबत बसत असतील तर तुम्ही लाचार


बाळासाहेब ठाकरेंचा अपमान एका मंत्र्यानं केल्यानंतर सुद्धा, बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार म्हणवून घेणारे, अयोध्येत जाऊन राजकीय उत्सव साजरे करणारे, आमचीच शिवसेना आहे म्हणणारे अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. मुख्यमंत्र्यांनी साधा निषेधही केला नाही. ते कसले वारसदार. त्यांना कोण वारसदार म्हणणार असे राऊत म्हणाले. बाळासाहेबांचा अपमान करणारे आजही तुमच्यासोबत बसत असतील तर तुम्ही लाचार आहात हे महाराष्ट्र म्हणतोय त्यात काय चुकलं असे राऊत म्हणाले. त्यामुळं मुख्यमंत्री चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेणार आहेत का? खुलासे करुन चालणार नाही असंही राऊत म्हणाले. बाळासाहेबांचा अपमान तुम्ही सहन करताय. तुम्ही बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे नाव घेऊ नका असा प्रहार राऊतांनी शिवसेना शिंदे गटावर केला. 


हवेतल्या गप्पा नको 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील याप्रकरणावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खडसावल्याबद्दल संजय राऊतांना विचारले. यावेळी राऊत म्हणाले की, मला माहित नाही. चंद्रकांत पाटलांना मंत्रीमंडळातून काढले आहे का? या हवेतल्या गप्पा नको आहेत. मुख्यमत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा असे राऊत म्हणाले.  नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे राऊत म्हणाले.  


शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय घडामोडीवर प्रदिर्घ चर्चा


काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडीवर प्रदिर्घ चर्चा झाली. भविष्यातील घडामोडींवरही चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या.
दरम्यान काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल राव हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांची वेळ मागितल्याची माहिती संजय राऊत यांनी आज दिली. 


महत्त्वाच्या बातम्या: 


Sharad Pawar Uddhav Thackeray :  मविआत मतभिन्नता; पवारांच्या भेटीसाठी ठाकरे सिल्वर ओकवर, बंद दाराआड सव्वा तास चर्चा