MNS Claims Puneshwar Narayaneshwar Mandir : देशात सध्या ज्ञानवापीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच पेटला आहे. आजपासून जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणाची (District Court) सुनावणी होणार आहे. या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. ज्ञानवापीचा मुद्दा तापत असताना आता पुण्यातील पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदिरांच्या (Puneshwar Narayaneshwar Mandir) जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील या दोन मंदिरांच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत, या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी काल जाहीर केलं आहे.


कालच्या सभेत बोलताना अजय शिंदे यांनी म्हटलं की, पुण्येश्वराला पण तेवढाच मोठा इतिहास आहे. अल्लाउद्दीन खिलजीचा एक सरदार बडा अरब पुण्यावर चाल करुन आला त्यावेळी त्यानं हे भगवान शंकराचं मंदिर उध्वस्त केलं. एक मंदिर नाही तर दोन मंदिरं उध्वस्त केली. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरं उध्वस्त केली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही दोन्ही मंदिरं कुठं आहेत. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडील बाजूला कुंभार वेसजवळ आहे. जिथं आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांच्या वर मशिदी निर्माण झाल्या आहेत, असा दावा अजय शिंदे यांनी केला आहे. 


अजय शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसेची नेमकी भूमिका काय असेल याकडे लक्ष असणार आहे. कालच्या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा काढला होता. मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावरही त्यांनी भाष्य केलं होतं. भोंगे हटवण्यासाठीचं आंदोलन सुरुच राहील असा इशाराही राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत दिला होता. अयोध्या दौरा का स्थगित केला याविषयी देखील राज ठाकरे यांनी सविस्तर भाष्य कालच्या सभेत केलं होतं. 


ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी


ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयाकडे सोपवली आहे. या प्रकरणी 5 महिलांच्या याचिकेसह इतर याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. तसेच, काशी विश्वनाथ मंदिराचे महंत डॉ. कुलपति तिवारी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याबाबत वाराणसी कोर्टात याचिका करणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या


Raj Thackeray : अयोध्या दौरा स्थगितीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले! म्हणाले, दौऱ्याच्या निमित्तानं सापळा, माझी पोरं...


Raj Thackeray Rally : 'आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं, वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही?' राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे दहा मुद्दे