Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात (District Court) सुनावणी होणार आहे. या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयाकडे सोपवली आहे. या प्रकरणी 5 महिलांच्या याचिकेसह इतर याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. तसेच, काशी विश्वनाथ मंदिराचे महंत डॉ. कुलपति तिवारी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याबाबत वाराणसी कोर्टात याचिका करणार आहेत. 


 पुण्यातील 'या' मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा 


ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील या दोन मंदीरांच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत, या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदीरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी काल जाहीर केलंय.


सुप्रीम कोर्टाचे आदेश 


दरम्यान, ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टाऐवजी जिल्हा कोर्टाकडे  होणार आहे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.  जिल्हा न्यायाधीश ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. ज्ञानवापी प्रकरणाची (शुक्रवारी) कोर्टात तिसऱ्यांदा सुनावणी झाली. न्यायमूर्ती वी आय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि पी एस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.


ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण अहवालात काय? 


ज्ञानवापी मशिदी प्रकरणाच्या सर्वेक्षण अहवालानुसार,  उत्तर ते पश्चिमच्या बाजूने चालत गेल्यास मध्यभागी शेषनागासारखी एक कलाकृती दिसून आली. त्याशिवाय या ठिकाणी दिसून आलेल्या अवशेषांनुसार एखाद्या मोठ्या भवनाचे अवशेष असल्याचं दिसून आलं असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.  दरम्यान, ज्ञानवापी मशिद प्रकरणातील एक वकील आजारी असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी सुनावणी पुढे ढकलली. तसेच, हिंदू याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलानं सांगितलं की, वाराणसी कोर्ट 23 मे रोजी या प्रकरणावरील सुनावणी सुरू ठेवणार आहे.


संबंधित बातम्या :


Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशिदीत हिंदू धर्माचं प्रतिक आढळलं; सर्वेक्षण अहवालातून दावा


Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी कोर्टाने कोणताही आदेश देऊ नये; सुप्रीम कोर्टाचे निर्देश, उद्या सुनावणी होणार