Pune News : अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला (Ajit pawar) धोका आहे, असं म्हणत पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने (BJP Official) पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीमुळे सध्या राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलं आहे.
रवींद्र साळगावकर पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. गणेशखिंड रस्त्यावर ई-स्क्वेअरच्या समोर एक प्लॉट आहे. त्यासंदर्भात त्यांनी तक्रार दिली आहे. यावर अजित पवारांची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार यांच्याविरोधात तक्रार देण्याचं कारण काय?
गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही मोजणी केली जात होती. सदर प्लॉटचा ताबा साळगावकर यांच्याकडे असल्याने त्यांना सतत धमकी येत आहे. याबाबत पुणे शहर तहसील कार्यालयातही या प्लॉटच्या संदर्भात अजित पवार यांच्या नावाची चिठ्ठी लावली होती. तरीही तहसील कार्यालयातून साळगावकर यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. याच प्रकरणासंदर्भात साळगावकर यांनी अजित पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी अर्ज स्वीकारला असून तपास सुरु करण्यात आला आहे.
लेटर हेडवर दिली तक्रार...
रवींद्र साळगावकर हे मागील अनेक वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी त्यांच्या लेटर हेडवर अजित पवार यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. अजित पवारांपासून मला धोका आहे, असं त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे. त्यामुळे अजित पवारांची चौकशी करा. त्यांचा तपास करण्याची मागणी केली आहे.