Chhatrapati Sambhaji Nagar : पुन्हा एकदा 'एबीपी माझा'च्या एका बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळत असून, पत्नीच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या सरपंचपतीसह ग्रामसेवकाला नोटीस (Notice) बजावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील गाजगाव येथे महिला सरपंच असताना देखील सरपंच पतीच ग्रामपंचायतमध्ये बसून कारभार हाकत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच गावकऱ्यांनी या सरपंच पतीचे स्टिंग ऑपरेशन करत व्हिडीओ देखील बनवला होता. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दाखवले होते. तर याच बातमीची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने संबधित सरपंच आणि ग्रामसेवकाला नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांना आज सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 


छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या गाजगाव ग्रामपंचायतची 2021 मध्ये निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत गावकऱ्यांनी आशाबाई तुळशीराम धुमाळ यांना सरपंचपदी निवडून दिले होते. मात्र सरपंचपदी निवड झाल्यापासून आशाबाई या ग्रामपंचायतमध्ये येतच नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.  तर त्यांच्या जागी ग्रामपंचायतचा सर्व कारभार त्यांचे पती तुळशीराम धुमाळ हे पाहत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला होता. सोबतच ग्रामपंचायतचे  कागदपत्रे देखील तुळशीराम धुमाळच हाताळत असून, पत्नीच्या सह्या करत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे तुळशीराम धुमाळ यांच्या ग्रामपंचायतमधील सततच्या हस्तक्षेपाला कंटाळून गावकऱ्यांनी त्यांचे थेट 'स्टिंग ऑपरेशन' केले आहे.   


'एबीपी माझा'च्या बातमीनंतर नोटीस...


छत्रपती संभाजीनगरच्या गाजगाव ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच असताना देखील, सरपंचपती तुळशीराम धुमाळ हे ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप करुन कामकाज बघत असल्याचा व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधीकडे आला होता. त्यामुळे याबाबत खात्री करण्यासाठी 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी थेट गावात पोहोचले. यावेळी गावकऱ्यांनी गंभीर आरोप केले. तुळशीराम धुमाळ हे ग्रामपंचायतमध्ये फक्त हस्तक्षेपच करत नसून, शासकीय कागदपत्रांवर पत्नीचे खोट्या सह्या देखील करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दाखवले होते. दरम्यान 'एबीपी माझा'च्या बातमीची दखल घेत, सरपंचपती तुळशीराम धुमाळ यांच्यासह संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला जिल्हा परिषद प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांना आज सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश जिल्हा परिषदचे सीईओ विकास मीना यांनी काढले आहेत. 


कारवाईची मागणी...


निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना देखील समान अधिकार मिळावा यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करत असतात. मात्र असे असताना देखील अनेक ठिकाणी महिलांना आरक्षण तर मिळाले, पण अधिकार मिळत नसल्याचे चित्र आहे. अशीच काही परिस्थिती गाजगावमध्ये देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे पत्नीच्या शासकीय कामात हस्तक्षेप करणाऱ्या सरपंचपती विरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. सोबतच ग्रामसेवक यांच्यासमोर हा सर्व प्रकार सुरु असून, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी गावकरी करत आहेत. 



संबंधित बातम्या : 


व्हिडीओ: महिला सरपंच पतीच पाहतो ग्रामपंचायतचं काम, अखेर वैतागलेल्या गावकऱ्यांनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'