Pune news : हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाला (pune news) अखेर कॉलेजमधून निलंबित कऱण्यात आलं आहे. अशोक ढोले असं या प्राध्यापकाचं नाव आहे. सिंबायोसिस कॉलेजमध्ये (symbiosis college) विद्यार्थ्यांना शिकवत असताना प्राध्य़ापकांनी हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर प्राध्यापकाला सिंबायोसिस कॉलेजने या व्हिडीओची शहानिशा करुन प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई केली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध कॉलेज असलेल्या सिंबायोसिस कॉलेजमध्ये हा सगळा प्रकार घडला. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माच्या देवदेवतांचं उदाहरण देत प्राध्यापकांनी आक्षेपार्ह विधान केलं आहे. या प्राध्यापकांचा शिकवतानाच व्हिडिओ समोर आला होता. यात हिन्दू देवांसंदर्भात त्यांनी वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ पाहून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. प्राध्यापकांना गाठून त्यांना पोलीस ठाण्यात नेलं.
प्राध्यापकांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आणि सगळ्याकडे असलेला प्राध्यापकांच्या विधानाचा व्हिडीओ देखील दाखवला. हा सगळा प्रकार घडून 12 तासानंतरही प्राध्यापकावर गुन्हा दाखल झाला नाही. प्राध्यापकाने 12 वीच्या वर्गात शिकवताना हे विधान केल्याचं समोर आलं आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन
हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजचे प्राध्यापक अशोक ढोले यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान प्राध्यापक अशोक ढोले यांना अटक करण्याबाबत पोलिसांकडून टाळाटाळ सुरू असल्याचा आरोप मूळ तक्रारदार सकल हिंदू सामाजिक संघटनेने केला आहे. त्यावर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलंय. त्याचवेळी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापक अशोक ढोले यांना सिंबायोसिसच्या व्यवस्थापनाकडून निलंबित करण्यात आल आहे.
पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही?
या सगळ्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप मूळ तक्रारदार सकल हिंदू सामाजिक संघटनेने केला आहे. मात्र अशा प्रकरणात संपूर्ण व्हिडीओची शहानिशा केल्याशिवाय कारवाई करता येत नसल्याच्या चर्चा आहेत. अशा प्रकरणांमध्य़े जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कारवाई करताना संवेदनशीलपणे कारवाई करावी लागते. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस कशा प्रकारे कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.