Jayant Patil Speech : महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. या आठवड्यात आज (3 ऑगस्ट) अखेर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची विरोधी पक्षनेतेपदी (Opposition Leader) निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर सभागृहाकडून वडेट्टीवार यांचे अभिनंदन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांनी वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचा संबंध नेहमी सौहार्दपूर्ण असायला पाहिजे, असं म्हटलं. हे सांगतानाच त्यांनी ते अर्थमंत्री आणि नारायण राणे विरोधी पक्षनेते असतानाचा किस्सा सांगितला. नारायण राणे यांचा कोट घालून अर्थसंकल्प मांडल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.


'नारायण राणेसाहेबांचा कोट घालून अर्थसंकल्प मांडला'


जयंत पाटील म्हणाले की, "विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचा संबंध नेहमी सौहार्दपूर्ण असायला पाहिजे. विरोधी पक्षात बसणाऱ्यांसोबत सत्ताधारी पक्षाने चांगलं, आपुलकीने वागलं पाहिजे, त्यांना कोणता त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण विरोधी पक्षात बसणाऱ्या पक्षाने सत्ताधारी पक्षाची कशी काळजी घेतली पाहिजे, याचं उदाहरण सांगतो. मी एकदा अर्थसंकल्प मांडणार होती, क्रिकेटची मॅच चार वाजता होती, अरुण गुजराथी सभापती होते, त्यांना विनंती केली की मला उद्या अर्थसंकल्प लवकर म्हणजे एक किंवा दोन वाजता मांडण्याची परवानगी द्यावी, कारण चार वाजता मॅच सुरु झाली तर अर्थसंकल्प कोण बघणार नाही. ते म्हणाले की विरोधी पक्षनेत्यांशी बोललं पाहिजे. त्यांनी राणेसाहेबांना फोन दिला, ते म्हणाले जयंत तू म्हणशील ती वेळ, पण कपडे काय घालणार ते सांग. मी म्हणालो, कपडे काय शर्ट आणि पँट, त्यावेळी मी बरंच वजन कमी केलं होतं. काही बसेना झालं झालं. ते म्हणाले नाही, नाही, महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुटाबुटातच आला पाहिजे. मी म्हटलं साहेब साईज बिघडलीय, बसत नाही. ते ठिकाय म्हणाले. आदल्या दिवशी मी माझ्या दालनात आलो, तिथे टेलर हजर. तो सारखा हात लावत होता, मी म्हटलं अंगाला हात लावायचा नाही, मी काही माप देणार नाही. तो म्हणाला आम्हाला साहेबांनी सांगितलंय. बळजबरीने माप घेऊन, दुसऱ्या दिवशी मी नारायण राणेसाहेबांचा कोट घालून अर्थसंकल्प मांडला. सांगण्याचा मुद्दा असा की विरोधी पक्षाचा आणि सत्ताधारी पक्षाचा संबंध सभागृहात आणि सभागृहाबाहेर अतिशय मधूर आणि सौहार्दपूर्ण असला पाहिजे." 


राणेंनी वळून बघितलं तरी विरोधी पक्षातील आमदार अर्ध्या सेकंदात खाली बसायचे


विरोधी पक्षनेते जर खंबीर असतील अनेक प्रश्नांना या खुर्चीने न्याय दिलेला आहे हे मी 35 वर्षांत पाहिलं आहे. नारायण राणे यांचा मी उल्लेख करेन. ते असे विरोधी पक्षनेते होते की त्यांनी नुसतं डावीकडे बघितलं तर इकडचं सैनिक खाली बसायचं, एवढा त्यांचा दरारा होता. त्यांनी वळून जरी बघितलं तरी सगळे विरोधी पक्षातील आमदार अर्ध्या सेकंदात खाली बसायचे. त्यांचा एखाद्या विषयाचा अभ्यास देखील मोठा होता. सभागृहात त्यांनी अनेक भाषणं केली. मी त्यावेळी अर्थमंत्री होतो तेव्हा प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांचं भाषण प्रचंड अभ्यास करुन असायचं, त्यांचं उत्तरं काढून उत्तरे देण्याचं काम आम्ही करायचो. त्यावेळी सभागृहात असं वाटायचं की जयंत पाटलांनी काय अर्थसंकल्प मांडलाय, सगळं चुकीचंच माडलंय की काय, असंही जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्याबाबत सांगितलं. 


VIDEO : Jayant Patil : Narayan Rane यांचा कोट घालून अर्थसंकल्प मांडला,सत्ताधारी-विरोधकांच्या नात्याचा किस्सा



हेही वाचा


अजित पवार पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा? फडणवीसांनी सोडले मौन म्हणाले आता बदल नाहीच