मुंबई: पुण्यातील उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट झाली... पण त्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाचं गुऱ्हाळ अद्याप काही संपेना. अजितदादा गाडीतून झोपून जाताना आख्ख्या जगानं पाहिलं... ते कॅमेरामध्येही कैद झालं, पण अजितदादांची भूमिका मात्र 'तो मी नव्हेच' अशीच आहे. मी उजळ माथ्याने फिरणारा माणूस, मला लपायची काय गरज... असाच पवित्रा अजितदादांनी घेतलाय, पण गाडीतून लपून जातानाचा तो कोण याचंही उत्तर त्यांनी द्यायला हवं.
अजित पवारांना त्यावर विचारल्यानंतर 'अरे वेड्या, मी त्या गाडीत नव्हतोच' असं उत्तर त्यांनी दिलं. पण राज्यातील जनतेला मात्र ते काही पटल्याचं दिसत नाही. अजित पवारांनी नटवर्य प्रभाकर पणशीकरांसारखा जो होरा लावलाय ना... तो मी नव्हेच... तो त्यांना सूट होत नाही. अजित पवारांनी कितीही वेळा सांगितलं की त्या गाडीत ते नव्हतेच, पण लोकांना पॉलिटिक्स कळतंय. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार होते, आणि गाडीतून लपून जातानाही दिसले.
मग राज्यातील सर्वसामान्यांना प्रश्न पडतोय की, अजित पवार अशी लपवाछपवी का करत आहेत? तसं पाहायला गेलं तर त्याची काहीही गरज नव्हती. त्या बैठकीत आपण होतो अशी जेव्हा अजित पवार कबुली देतात त्यावेळी त्या गाडीमध्येही होतो हे सांगायला संकोच कसला करतात?
गाडी गेटला धडकली आणि कॅमेरा वळले
खरं तर मीडियाला चकवण्याचा अजित पवारांचा प्लॅन हा फुलप्रूफ होता. आधी आपली गाडी रिकामी पाठवून त्यांनी मीडियाला जवळपास चकवलंच होतं. पण तुमचं आणि तुमच्या ड्रायव्हरचं नशीबच फुटकं. ती कोरी करकरीत गाडी गेटला धडकली. आता गाडी धडकल्यावर मीडियाचे कॅमेरे वळणारच ना आणि त्या कॅमेऱ्यांमध्ये तुमची छबी कैद होणारच ना.
आता गाडीला साधं खरचंटलं जरी तरी ड्रायव्हर आणि त्याचा मालकाच्या काळजावर त्याचे खरके उमटतात. भर रस्त्यात ते हमरीतुमरीवर येतात. पण इथे ना तुमचा ड्रायव्हर उतरला ना तुम्ही. मग तर संशय आणखीनच बळावला. इतकं सगळं होऊनही अजित पवार उलट मीडियावरच का डाफरतायत?
उलट अशी लपवाछपवी करण्यापेक्षा सरळ मीडियासमोर यायचं आणि काकांची खुशाली विचारायला आलो होतो असं म्हणून मोकळं व्हायचं ना. अजित पवार लपले आणि येथेच चुकलेत.
ठीक आहे दादा, लोकशाही आहे, तुम्ही शेवटपर्यंत मानू नका. पण पब्लिकला जे समजायचंय ते समजलंय. दादा, तुमचे गनिमी कावे मीडियाला काही नवीन नाहीत. राज्यातील 80 तासांचं सरकार उलथल्यानंतर अजित ज्या शिताफीनं सिल्व्हर ओकवर पोहोचले होते तेही मीडियाच्या कॅमेऱ्यानं टिपलं होतं. आग्र्याच्या किल्ल्यातून जशी महाराजांनी बुरडी पेटाऱ्यातून सुटका करुन घेतली, तशी तुम्ही त्या कारमधून मीडियाच्या वेढ्यातून सुटका करुन घ्यायला निघालात. पण दादा... हल्लीचे कॅमेरे आणि त्यांचं रिझोल्युशन जाम हायटेक झालं आहे. तेव्हा असं काही करायचं असेल तर आधी एखादी रिहर्सल करुन घ्या. म्हणजे काय आहे... तुमच्या सुटकेचा थरार... असा जगजाहीर व्हायला नको आणि मीडियाला प्रश्न विचारण्याची वेळच यायला नको.
ही बातमी वाचा: