महाराष्ट्र :  राजकारण्यांच्या अनेक लोकं निवेदन देण्यासाठी धावपळ करत असतात. पण त्या निवेदनांचे पुढे काय होते हा प्रश्न नेहमीच प्रत्येकाला पडत असतो. पण माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही सर्व माहिती आपल्याला उपलब्ध होते. नुकतीच माहिती अधिकाराने दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दररोज येणाऱ्या निवेदनावर 347 स्वाक्षऱ्या करत असल्याचं माहिती अधिकाराच्या माहितीमधून समोर आलं आहे. तर त्यांनी त्यांच्या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये 1,14,414 स्वाक्षऱ्या केल्या असल्याचं देखील समोर आलं आहे. 


माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारामध्ये ही माहिती मागितली होती. त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार, 30 जून 2022 पासून 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 1.14 लाख निवेदनांचा निपटारा केला आहे. यामध्ये व्हीआयपी पत्रव्यवहारांची संख्या ही एकूण 32,508 इतकी आहे. तर यामध्ये जनरल पत्रांची संख्या 74,703 इतकी आहे. म्हणजेच दर महिन्याला फडणवीस यांनी  सरासरी 10,402 निवेदनांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे दर दिवसाला फडणवीस 347 निवेदनांवर स्वाक्षऱ्या करत असल्याचं यामुळे स्पष्ट झालं आहे. 


ही निवेदनं उपमुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत कशी पोहचतात?


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार्‍या प्रत्येक निवेदनावर ते स्वत: स्वाक्षरी करतात. तसेच त्या निवेदनाचे पुढे काय करायचे याचा शेरा देखील ते त्यांच्या निवेदनावर लिहितात. त्यानंतर ते निवेदन त्यांच्या कार्यालयामार्फत  संबंधित विभागाकडे सुपूर्त करण्यात येते. पण हे निवेदन  संबंधित खात्याकडे जाण्यापूर्वी त्यावर एक युनिक नंबर टाकण्यात येतो. त्याची डिजीटल प्रत ही फडणवीसांच्या कार्यालयात ठेवली जाते. यामुळे त्या निवेदनाचा संबंधित विभागाकडे पाठपुरवठा करण्यास सोपे जाते. 


मुख्यमंत्री असल्यापासूनची फडणवीसांची पद्धत


देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून ते हीच पद्धत वापरत असल्याचं देखील या माहिती अधिकारामधून समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाणाऱ्या  प्रत्येक कागदाचा तपशील हा कधीही पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो. तसेच अगदी नावाने सुद्धा फडणवीसांच्या कार्यालयात त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. इतकेच नाही तर ई-ऑफिसमध्ये तुमचे निवेदन ज्या विभागाकडे गेले, ते कोणत्या अधिकार्‍याकडे आहे आणि त्यावर आतापर्यंत काय काय कारवाई झाली या संदर्भातली सर्व माहिती तात्काळ उपलब्ध होते. 


देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक सॉफ्टवेअर विकसित केल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरील काम अगदी सोप्या पद्धतीने करता येते. त्यामुळे  प्रत्येक कागदाचा संपूर्ण तपशील अगदी सहज मिळवता येतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


"गावात 2 कोटी 'लखपती दीदी' बनवण्याचं माझं स्वप्न"; PM मोदींची लाल किल्ल्यावरुन ड्रोन योजनेची घोषणा