पुणे : पुण्यातील (Pune) गणेशोत्सव मंडळांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बैठक घेतली. यावेळी मिरवणुका वेळेत पार पाडण्याची विनंती गणपती मंडळांना केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रो (Metro) ही रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
दहीहंडीच्या वेळेस गोविंदा पथकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. विसर्जन वेळेवर होण्यासाठी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक ही दुपारी 4.30 निघणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा दणक्यात साजरा होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज होणार असल्याचं अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं.
अजित पवारांकडून 'त्या' चर्चांना पूर्णविराम
चंद्रकांत पाटील यांच्यावरील नाराजीच्या चर्चांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "चंद्रकांतदादांना मुद्दामहून बोलवत नाही असं नव्हे. कधीकधी आमच्या वेळा जुळत नाहीत. पण आम्ही सगळेजण खेळीमेळीने काम करतो. मुख्यमंत्री आणि आमच्यात योग्य समन्वय आहे. पुणेकरांचा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडावा यासाठी आज आम्ही बैठकीला आलो आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत."
'भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी'
छगन भुजबळ यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, "माईक सिस्टीममुळे भाषण मला व्यवस्थित ऐकायला आलं नाही. सोशल मीडियावर मी काही बातम्या पाहिल्या. पण माझे कार्यक्रम असल्यामुळे आमच्यात काही बोलणं झालं नाही. राजकीय वर्तुळात भाषण करताना योग्य काळजी घ्यायला हवी. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याचा प्रयत्न आपण करायला हवा. आमचे विचार जरी वेगवेगळे असले तरीही सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकरणासाठी बोलताना आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी."
तर राष्ट्रीय अध्यक्षांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, "मला माझ्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष केलं आहे त्यामुळे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे." दुष्काळाबाबत अनेक बैठका झाल्या असून प्रशासनाला योग्य सूचना देण्यात आल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. "मी बैठका घेतल्या तर सात दिवसांमध्ये परिणाम होते पण त्यांनी घेतल्या तर दोन महिने काही परिणाम पाहायला मिळत नाही," असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.