पुणे : पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज पहाटे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. सरग यांचे 57 वर्षाचे होते. तीन वर्षांनी ते निवृत्त होणार होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांची पत्नी आणि मुलगा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. ते एक उत्तम व्यंगचित्रकार देखील होते. अनेक दिवाळी अंकात त्यांची व्यंगचित्र प्रकाशित व्हायची.  त्यांनी औरंगाबाद तरूण भारतला उपसंपादक म्हणून काम केलं होतं.  माहिती विभागात बीड, परभणी नगर आणि पुणे इथे त्यांनी काम केले होते. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
सरग यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही श्री. सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.  


खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पुणे जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सरग कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, असं सुळे यांनी म्हटलं आहे.