Pune Crime News : बसस्टॉप, रेल्वे स्थानकावरील  (Pune Crime News) भांडणं किंवा राडे आतापर्यंत आपण पाहिले आहेत. मात्र आता पुण्यातील विमानतळावर देखील अशीच घटना घडली आहे. पुणे विमानतळावर 24 वर्षीय तरुणीने चांगलाच गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. तरुणीने थेट सीआयएसएफ महिला इन्स्पेक्टरच्या हाताला चावा घेतल्याची घटना घडली आहे. ही सर्व घटना 12 मार्चला रात्री घडली. या घटनेमुळे रात्री राडा घातल्यामुळे विमानतळ परिसरात काही प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी तरुणीला अटक करण्यात आली आहे. 


तरुणीने थेट विमानतळावर घातला गोंधळ


याप्रकरणी पुणे विमानतळावर कार्यरत असणाऱ्या सीआयएसएफ इन्स्पेक्टर (निरीक्षक) रुपाली ठोके (वय 39 वर्षे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या संदर्भात गुंजन अगरवाल (वय 24 वर्षे) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुंजन अगरवाल तरुणीने टॅक्सीमधून प्रवास करुन विमानतळावर पोहोचल्यावर तिने टॅक्सी चालकाला पैसे देण्यास नकार दिला. टॅक्सी चालकाने एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे मदत मागितली असता टर्मिनल मॅनेजर भक्ती लुल्ला यांनी गुंजन यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी लुल्ला यांना शिवीगाळ केली तसेच विमानतळ प्रस्थान (departure) गेट क्रमांक 1 वर रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये जाऊन गोंधळ घातला. 


मारहाण केली अन् अंगठ्याला चावा घेतला...


हा सगळा प्रकार जेव्हा विमानतळावर सुरक्षतेसाठी कार्यरत असलेल्या महिला निरीक्षक रुपाली ठोके यांना निदर्शनास आला त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी अगरवालची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी तरुणीने रुपाली ठोके यांचं काही न ऐकता त्यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडली आणि त्यांना चापट मारली. इतक्यावर न थांबता आरोपी तरुणीने ठोके यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला. या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी या तरुणीला अटक केली.


तरुणीवर तातडीने कारवाई...


तरुणीने विमानतळावर राडा घातला. इतर प्रवाशांनी हा राडा पाहिला. त्यावेळी माहिला निरीक्षकावर त्या तरुणीने हल्ला केला. त्यावेळी माहिला निरीक्षकाने तक्रार दाखल केली. सरकारी कामात अडथळा कोणताही प्रवासी आणू शकत नाही. मात्र या तरुणीने थेट हल्ला केला आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तरुणीला अटक करण्यात आली आहे.