Pune Crime News : नववर्षाचं स्वागत आणि कोरेगाव भीमा परिसरातील विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर  (Pune Police) पोलिसांकडून पुणेकरांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी (Crime) गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. पोलिसांनी शहरात पहारा देत छापेदेखील टाकले. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक अवैध प्रकार शहरात सुरु असतात. त्यांच्यावर कारवाई करणं दरवर्षी पोलिसांसमोर मोठं आव्हान असतं.


या कारवाईत 4,091 गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 481 जण सापडले आहेत आणि 67 जणांना अटक करण्यात आली. नवे पोलीस आयुक्त रितेशकुमार आणि सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यानुसार स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेतील विविध पथकांनी बुधवारी (28 डिसेंबर) रात्री नऊ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत शोध मोहीम राबवून गुन्हेगारांची धरपकड केली. 


बेकायदेशीर शस्त्र बाळगल्यामुळे 39 जणांना अटक करुन त्यांच्याकडून 40 कोयते, 4 तलवारी, 3 सत्तूर, पिस्तुल आणि जिवंत काडतुसं जप्त करण्यात आले आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन तस्कराला अटक करुन 12 हजारांचा मेफेड्रॉन साठा जप्त करण्यात आला आहे. गावठी दारु विक्री प्रकरणी 46 गुन्हे दाखल करुन 48 हजारांचा दारु साठा जप्त करण्यात आला. 


आरोपींना नोटीस...


जामिनावर कारागृहातून सुटून आलेल्या आरोपींनाही नोटीस देण्यात आली. नाकाबंदीच्या वेळी 195 चालकांवर कारवाई करुन दोन लाख रुपये दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आलं आहे. अतिरिक्त आयुक्त आणि वाहतूक उपायुक्त यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


एका दिवसात दोन मोठ्या कारवाया


राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयाची विदेशी दारु जप्त करण्यात आली. या प्रकरणी 7 जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील मुद्देमालासह एक चारचाकी गाडी देखील जप्त केली. त्यासोबतच 11 लाख रुपयांचे "म्याव म्याव" जप्त करण्यात आलं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे. थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी शहरात चांगलीच तयारी सुरु आहे. त्यामुळे शहरात अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. त्यासोबतच काही विशेष पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत.