Pune Crime News : पुण्यात बाकी गुन्ह्यांबरोबर सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. रोज अनेकांना अनेक गोष्टींचं आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. काही इन्व्हेस्टमेंट कंपन्यांचंदेखील जाळं पुण्यात मोठ्या प्रमाणात आहे. एका इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवत 200 कर्जदारांची 300 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे मालक सेलवाकुमार नडारने अनेक लोकांची फसवणूक केली आहे. 


लॉकडाऊन काळात कर्ज थकबाकीदार अशा आयटी क्षेत्रातील लोकांची माहिती मिळविली. तुमचे कर्ज मी घेतो असे सांगत त्यांच्या नावावर एकाच वेळी तीन - तीन बँकांमधील कर्ज काढले. हे पैसे त्याने त्याच्या अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवी स्वरुपात ठेवण्यास सांगितले. अनेक गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. मात्र जेव्हा गुंतवणूकदार पैसे घेण्यासाठी गेले असता त्यांच्या कार्यालयाला कुलूप होतं. आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यावर 16 जणांनी एकत्र येत पोलिसात धाव घेतली. प्राथमिक तपासा दरम्यान 200 लोकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून रक्कम ही 300 कोटीच्या जवळपास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे मालक सेलवाकुमार नडार हा फेब्रुवारी पासून गायब आहे.


आयटी क्षेत्रातील लोकांची माहिती



या सेलवाकुमार नडार याने लॉकडाऊनमध्ये आयटी क्षेत्रातील अनेक लोकांची माहिती घेतली. या सगळ्या लोकांची यादी तयार केली. नडार आणि साथीदारांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. आरोपी नडार आणि खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचाऱ्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी योजना जाहीर केल्या होत्या. अनेकांकडून त्वरीत कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते. 


अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या खासगी वित्तीय संस्थेतील प्रतिनिधी अनेक गुंतवणूक दारांकडून पैसे घेत होते. ते आलेले पैसे  शेअर बाजार, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवायचे. अशा प्रकारे त्यांनी जाळं तयार केलं होतं. याच मार्गाने त्यांनी तब्बल 200  लोकांना किमान 300 कोटींचा गंडा घातला आहे. उच्चशिक्षित आणि नामांकित कंपनीत कार्यरत व्यक्तीची 36 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केल्यानंतर अशाचप्रकारे एकूण 200 जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.


गुंतवणूक करताना काळजी घेण्याचं आवाहन 


अशा प्रकारच्या अनेक गुंतवणुकीचं आमिष दाखवणाऱ्या कंपन्या पुण्यात आहे. या कंपन्यांकडे अनेकांची यादी असू शकते. त्यामुळे कोणत्याही कंपनींत किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.