Unseasonal Rain : सध्या राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) धुमाकूळ घातला आहे. तर काही भागात गारपीट झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. कुठे ज्वारी, गहू, हरभरा तर कुठे द्राक्ष, आंबा, केळी या बागांचं मोठं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली आहे. पाहुयात कुठे कुठे अवकाळी पावसानं हजेरी लावली....


सोलापूर जिल्ह्यात पिकांना फटका


सोलापूर (Solapur) जिल्ह्याला देखील या अवकाळीचा मोठ फटका बसला आहे. या पावसामुळं आठ तालुक्यातील 104 गावांना मोठा फटका बसला आहे. या 104 गावातील सुमारे 3469 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे. बार्शी तालुक्याला देखील बसला आहे. बार्शीतील मालवंडी येथील येथील शेतकरी जनार्दन थोरात या शेतकर्‍याची द्राक्ष बाग कोसळून सुमारे 15  लाखांचे नुकसान झाले आहे. यासह झाडी बोरगाव, तांबेवाडी या गावातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्यानं द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बाग पूर्णपणे तयार झाली होती. काही दिवसात पीक बाजारात येणार होते. मात्र, वादळी वारा आणि अवकाळी पावसानं हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे
 


हिंगोली जिल्ह्यात संत्र्याच्या बागांचं मोठं नुकसान


हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळं जिल्ह्यातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील हिंगोली वसमत औंढा नागनाथ सेनगाव कळमनुरी अशा जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. यामुळं शेतातील गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज, खरबूज या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हिंगोली जिल्ह्यातील संत्र्याच्या बागांना गारपिटीनं झोडपलं आहे. त्यामुळं झाडाला असलेली सर्व संत्रा तुटून पडली आहेत. बागेमध्ये सर्व संत्र्याचा सडा पडल्याचे चित्र दिसून येत आहे.  


 नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट 


नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटी झाली आहेय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंआहे.  या नुकसानीची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. आज मुदखेड तालुक्यातील विविध गावांच्या शिवारात पालकमंत्री सर्व अधिकाऱ्यांना घेऊन दाखल झाले होते. मुदखेड तालुक्यातील कलिंगड, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री महाजन यांनी पाहणी केली. यावेळी भाजपचे इतर लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच विभागप्रमुख उपस्थित होते. दरम्यान आमचं सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देईल असे आश्वासन पालकमंत्री महाजन यांनी सांगितलं.


जळगाव जिल्ह्यातही वादळी पाऊस


जळगाव जिल्ह्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने अनेक भागात केळीसह काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका आणि ज्वारीच्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवस पासून जळगाव जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. दरम्यान, शासनाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.


नाशिक जिल्ह्यात अवकाळीमुळं पिकांचं मोठं नुकसान


नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची झोप उडवली असून जिल्ह्यातील चांदवड, येवला, निफाड, बागलाण, सटाणा देवळा आदी तालुक्यात कांद्यासह द्राक्ष बागांचे (Grapes Farm) प्रचंड नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर, वनसगाव, उगाव, देवपूर, ब्राह्मणगाव, रानवड आदी भागांत पंधरा मिनिटे गारपीट झाल्याने कांदा, द्राक्षबागा संकटात सापडल्या, तर येवला, नांदगाव, देवळा तालुक्यात कांद्यासह मका, गहू, डाळिंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपिटीचा फटका कांद्याच्या पातीवरच बसल्याने वाढ खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. 


नंदुरबार जिल्ह्यात मिरचीला फटका


 नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातही अवकाळी पावसानं  हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ओली लाल मिरची वाळवण्यासाठी पथरींवर टाकली जात असते. मात्र, गेल्या चार दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामध्ये 15 हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची खराब होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


परभणी जिल्ह्यातही अवकाळी पाऊस  


मागच्या तीन दिवसांपासून परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. कुठे गारपीट होत आहे तर कुठे वादळी वारे अन जोरदार पाऊस पडत आहे. परभणीच्या जिंतुरमध्ये तर जोरदार अवकाळी पावसाने चक्क उन्हाळ्यात ओढ्याला पूर आला आहे. जिंतुर तालुक्यातील आडगाव बाजारावरुन चितरनेरवाडी इथे जाणाऱ्या ओढ्याला चार ते पाच फूट पाण्याचा पूर आला असल्यामुळं चितरनेरवाडी येथील बाजारावरुन जाणाऱ्या गावकऱ्यांचा संपर्क काही काळ तुटला होता. या परिसरातील ज्वारी आणि गव्हाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी  : कृषीमंत्री 


राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लवकरच निर्णय घेतील असेही कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Unseasonal Rain: नाशिकसह जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा; पाच जनावरे दगावली, पिके कोलमडली