Pune Crime News :  पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमधे (Pune Crime) सागर ससवडे नावाच्या एमबीबीएस डॉक्टरवर सावकारकीचा गुन्हा नोंद झाला आहे. एका महिलेला व्याजाने पैसै देऊन तिची नऊ गुंठे जमीन हडप केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आहे. मात्र गुन्हा नोंद होऊनदेखील पोलिसांना सावकारी करणारा डॉक्टर सापडत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. संगिता फाळके असं या फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगिता फाळकेंना जावयाच्या नोकरीसाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी डॉ. सागर सासवडेकडून दहा लाख रुपयांचं कर्ज घेण्याचं ठरवलं होतं.  त्यासाठी फाळके यांनी त्यांची नऊ गुंठे जमीन डॉ. सागर सासवडेकडे गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला.  प्रत्यक्षात सागर सासवडेने त्या जमिनीचे खरेदी नोंद करुन नऊ लाख रुपये फाळके यांना दिले. व्याज म्हणून एक लाख रुपये त्याने आधीच कापून घेतले.  त्यानंतर फाळकेंनी तीन टक्के दराने व्याज आणि मुद्दल असे मिळून 13 लाख रुपये सासवडेला दिले आणि त्यांची जमीन परत मागितली मात्र सासवडेने जमीन देण्यास नकार दिला. जमीन परत देण्यासाठी संगीता फाळकेनी सतत तगादा लावल्यावर डॉ. सागर सासवडेने संगिता फाळके यांच्या जावयाचं अपहरण करून त्याला मारहाण केली. त्यानंतर तब्बल एक वर्ष संगीता फाळकेंनी पोलीस स्टेशनला चकरा घातल्यावर पोलिसांनी डॉ. सागर सासवडे विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. अद्याप सासवडेला अटक करण्यात आली नाही. 


डॉ. सागर सासवडे हा एमबीबीएस डॉक्टर असून चाकणमधील जिल्हा आरोग्य उपकेंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून काम करतो.  मात्र तो कामावर वेळेवर येत नाही आणि नीट कामही करत नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्याच्याबद्दल अनेक तक्रारी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार डॉक्टर सागर सासवडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र पुढची कारवाई होत नसल्याने जमीन परत मिळणार का?, असा प्रश्न संगिता फाळकेंना पडला आहे. डॉक्टर असूनही पोलिसांना सापडत नसल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यांच्या कारवाईला सुरुवात केल्यास अनेक लोक तक्रार देण्याची शक्यता आहे. सागर सासवडे आणि त्याच्या सावकारकीची या परिसरात मोठी दहशत आहे. तक्रारीनंतर वर्षभराने सागरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे आता सागरला शोधणं हेच पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.