Pune Crime News : पुणे पोलिसांनी कोयता गॅंगच्या (koyta gang) विरोधात मोठी (Crime News) कारवाई केली आहे. त्यात कोयता गॅंगचा म्होरक्या बिट्टया कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंतच कोयता गॅंगविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. युनिट -6 ने ही कारवाई केली आहे. 


पोलिसांनी (Pune Police) कोंबिंग ऑपरेशन करत ही कारवाई केली आहे. कोयता गॅंगचे हे सगळे रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यादरम्यान पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोयता गॅंगविरोधात पुणे पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्यांचं धाडसत्र सुरुच आहे. मागील दोन दिवस पुणे पोलीस कोम्बिंग ऑपरेशन सुरु आहे. त्यात रात्रभर पोलीस शहरातील विविध भागाची झाडाझडती करत आहेत. काल (11जानेवारी) रात्रभरात 32 जणांवर गुन्हे दाखल केले आणि त्यांच्याकडून 38 कोयते जप्त केले. 


पोलीस आयुक्त रतेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरुन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, डीसीपी अमोल झेंडे, संदीपसिंग गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. विजयकुमार मगर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.


कोम्बिंग ऑपरेशनच्या पहिल्या रात्री धाडसत्र सुरु केलं होतं. पोलिसांनी (Pune Police) कोंबिंग ऑपरेशन राबवलं. त्यात अनेक गुन्हेगारांंची झाडाझडती सुरु केली आहे. त्यात शहरातील 3,765 गुन्हेगारांची चौकशी केली. पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची चौकशी केली. तपासात 698 गुन्हेगार एकाच पत्त्यावर राहत असल्याचे निष्पन्न झालं. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, 145 कोयते जप्त करण्यात आले. मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला होता. शहरातील विविध भागात त्यांनी दहशत निर्माण केली होती. 


धाडसत्र सुरुच...


पुण्यात मागील काही दिवसांपासून शहरातील हॉटेल, लॉज, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती. सिंहगड रोड पोलिसांनी धायरी परिसरात राहणाऱ्या नीलेश शिवाजी गायकवाड (वय 35 वर्षे) याला अटक करुन त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले होते. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 43 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 145 कोयते, तलवारी अशी हत्यारे जप्त करण्यात आले होते. 


संबंधित बातमी-


Pune koyta gang : आझम कॅम्पस परिसरात कोयता गॅंगचा धुमाकूळ; पुणे पोलीस कारवाई कधी करणार?