Beed News: पीकविमा द्या म्हणत निवेदनाची गाठोडे डोक्यावर घेऊन शेतकऱ्यांनी काढली दिंडी

Beed News: शेतकऱ्यांनी आडस ते केज अशी पायी दिंडी काढून तहसीलदारांना मागण्यांच्या निवेदनाचे गाठोडे देण्यात आले.

Continues below advertisement

Beed News: बीड जिल्ह्यातील (Beed District) केज तालुक्यातील आडस आणि परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीकविमा (Crop Insurance) आणि अतिवृष्टी अनुदानाची रक्कम तत्काळ मिळावी, या मागणीसाठी निवेदनाची गाठोडे डोक्यावर घेऊन चक्क 25 किलोमीटरची दिंडी काढली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुस्कर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आडस ते केज अशी पायी दिंडी काढून तहसीलदारांना मागण्यांच्या निवेदनाचे गाठोडे देण्यात आले. या हटके आंदोलनाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली. 

Continues below advertisement

अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील आडस येथील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी 8 वाजता तक्रार अर्जाचे गाठोडे डोक्यावर घेऊन, बंडी आणि अर्धी चड्डी अशा पेहरावात दिंडी काढली. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कळमआंबा, चंदनसावरगाव, कुंबेफळ, ढाकेफळ मार्गे तहसील कार्यालय, केज असे 25 किलोमीटर पायी मोर्चा काढून तहसील प्रशासनाला तक्रारी अर्जाचे गाठोडे सादर करण्यात आले. दुपारी 12 वाजता तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. सोबतच आंदोलन करणाचा शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार डी.सी. मेंडके यांनी, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक लवकरात लवकर बोलावण्यात येईल. या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासंदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. 

शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप 

पीकविमा भरताना व तो ऑनलाइन करतान व कागदपत्रांची जमवाजमव करताना शेतकरी वर्ग पिळला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. शेतकऱ्याचे हे दुःख वेशीवर टांगण्यासाठीच व शासन आणि विमा कंपनीला जाग यावी, यासाठीच आपण अर्धनग्न अवस्थेत पायी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिल्याची माहिती शिवरुद्र आकुसकर यांनी माध्यमांना दिली आहे. 

शेतकरी संकटात! 

यंदाच्या हंगामात सुरवातीलाच बीड जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यानंतर परतीच्या पावसाचा देखील फटका बसला. त्यामुळे पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात आता रब्बी हंगामात देखील बदलत्या वातावरणामुळे पीकांचे नुकसान आहे. अशात पीक विमा भरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन करतान व कागदपत्रांची जमवाजमव करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व मागण्या प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पायी दिंडी काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. 

बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या.. 

मराठवाड्यात 2022 वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या वर्षे मराठवाड्यात एकूण 1 हजार 23 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे यात सर्वाधिक 202 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे. 

धक्कादायक आकडेवारी! गेल्यावर्षी मराठवाड्यातील तब्बल एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola