पुणे : पुणे शहरातील मंगला थिएटरबाहेर एका तरुणाची निर्घृण हत्या (Pune Crime News) करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले आहे. तर अन्य सात आरोपींचा शोध सुरु आहे. मृत मुलाच्या नावावर एकूण 24 गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. जुन्या वैमनस्यातून आरोपीने खून केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
बुधवारी पहाटे 1.10 वाजण्याच्या सुमारास एका 35 वर्षीय तरुण नितीन म्हस्के चित्रपटगृहाबाहेर चित्रपटाचा लेट नाईट शो पाहून बाहेर पडला असताना त्याची हत्या करण्यात आली. त्याच्यावर तलवारी, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
शिवाजीनगर पोलिसांनी सागर कोळानट्टी ऊर्फ यल्ल्या (वय 32 वर्षे), मलिक कोळ्या ऊर्फ तुंड्या (वय 24 वर्षे), इम्रान शेख (वय 32 वर्षे), पंडित कांबळे (वय 27 वर्षे), विवेक नवधर ऊर्फ भोला (वय 24 वर्षे), लॉरेन्स पिल्ले (वय 33 वर्षे), सुशील सूर्यवंशी (वय 30 वर्षे), मनोज हावळे ऊर्फ बाबा (वय 25 वर्षे), आकाश गायकवाड ऊर्फ चड्डी (वय 24 वर्षे), रोहन ऊर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय 20 वर्षे), विवेक भोलेनाथ नवधरे (वय 27 वर्षे), अक्षय ऊर्फ बंटी साबळे (वय 21 वर्षे), विशाल भोले (वय 30 वर्षे, सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीवर हल्ला केल्यामुळे म्हस्के याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला तुरुंगात डांबण्यात आले आणि या वर्षी मे महिन्यात जामिनावर सुटका झाली. तेव्हापासून प्रतिस्पर्धी टोळी त्याचा पाठलाग करत होती आणि त्याचा काटा काढण्यासाठी वाट पाहत होती. बुधवारी म्हस्के हे त्यांचे तीन मित्र सोबत होते, त्यांना आरोपींनी चित्रपटगृहातून बाहेर पडण्यास सांगितले आणि त्यांच्यावर हल्ला केला.
नितीन म्हस्के जामीनावर बाहेर होता...
नोव्हेंबर 2022 मध्ये कोरेगाव पार्कमधील एका हॉटेलच्या बाहेर नितीन म्हस्के, अजय साळुंके आणि त्यांच्या इतर साथीदारांनी सागर कोळनट्टी याच्यावर हल्ला केला होता. कोळनट्टी आणि त्याचे साथीदार एका हॉटेलमधून वाढदिवस साजरा करुन बाहेर आल्यानंतर पार्किंगच्या परिसरात म्हस्केने त्यांना गाठून सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला केला होता. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर कोळनट्टीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीसांनी म्हस्के आणि त्याच्या साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याचाच बदला म्हणून सागर आणि त्याच्या साथीदारांनी म्हस्केचा काटा काढला.
इतर महत्वाची बातमी-