Pune Crime news : मागील तीन दिवसांपासून राज्यातून हादरवणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. पुण्यातूनदेखील अत्याचाराच्या घटना रोज समोर येत आहेत. त्यामुळे राज्यात सध्या मुली सुरक्षित आहेत का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच रोज अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच आपल्या हिंमतीने आणि धैर्याने सामूहिक बलात्कार होण्यापासून स्वत:चा बचाव केला आहे. चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र या मुलीने बलात्काराचा प्रयत्न हाणून पाडला.
ही घटना सोमवारी 5 जून रोजी सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घोरपडी परिसरात घडली. मुंढवा पोलिसांनी समीर शेख (रा. घोरपडी), कार्तिक आणि मुचा यांच्याविरुद्ध विनयभंग, मारहाणीचा प्रयत्न आणि पॉक्सो कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हे प्रकरण कोरेगाव पार्क पोलिसांकडे सोपवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी मोबाईलमध्ये मग्न होती, तेव्हा तिघे आरोपी तिच्याजवळ आले. त्यांनी बळजबरीने तिचा फोन हिसकावून घेतला आणि शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली आणि तिने नकार दिल्यास आणखी इजा होईल, अशी धमकी दिली.
हे घृणास्पद कृत्य करण्याच्या प्रयत्नात आरोपींनी तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने धैर्याने प्रतिकार केला आणि त्यांच्या तावडीतून निसटण्यात यश मिळविले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या माहितीला तत्पर प्रतिसाद देत घोरपडी परिसरात आरोपींना पकडले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात मुली असुरक्षित?
पुण्यात होत असणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहता पुणे मुलींसाठी सुरक्षित आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काहीच दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला मारण्याची आणि तिचं कॉलेज बंद करण्याची वारंवार धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी एका 21वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला गेला. ल्पवयीन मुलगी ही मार्केटयार्ड परिसरात राहते. ती एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेते. कॉलेजला जाण्यासाठी ती pmpml बसचा वापर करत होती. याच प्रवासादरम्यान दोघांची ओळख झाली होती. याच ओळखीचा आरोपीने गैरफायदा घेतला आणि तिला धमकी द्यायला सुरुवात केली. तिच्यावर वारंवार बलात्कार केला. डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023दरम्यान हा सगळा प्रकार घडला होता.