Mira road Crime News:  संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या मिरा रोड हत्याकांड प्रकरणातील (Mira road Murder Case) आरोपी मनोज साने (Manoj Sane) याला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज आरोपीला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी आणि मृत पीडित मुलगी सरस्वती वैद्य हे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये झालेल्या वादातून आरोपीने सरस्वतीची निर्घृण हत्या करत तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. 


मिरा रोड येथील नया नगर (Naya Nagar) पोलिसांना एका फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बंद असलेला दरवाजा उघडून पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना मोठा धक्काच बसला. मृतदेह कापण्यासाठी वापरण्यात आलेले कटर आणि इतर धारदार शस्त्र आढळून आले. त्याशिवाय, किचनमध्ये मृतदेह आढळून आला. त्याशिवाय मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा प्रकारही दिसून आला. या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांनाही धक्का बसला. 


पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता, तातडीने तपास सुरू करत आरोपी मनोज साने याला अटक करण्यात आली. आज आरोपीला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने आरोपीला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 


आरोपी मनोज साने हा 56 वर्षांचा असून पीडित मृत सरस्वती वैद्य ही 32 वर्षांची होती. मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटी आहे. तिथं हा सगळा प्रकार घडला. गीता आकाश दिप बिल्डिंग गीता नगर फेस -7, जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये मागच्या तीन वर्षांपासून हे जोडपं लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पंखा आणि प्रेशर कुकरचा वापर केला. त्यानंतर सर्वात आधी आरोपीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरचे तुकडे केले. कटर मशीनच्या मदतीनं मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली आरोपीनं पोलिसांना दिली. त्यानंतर ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केले. हत्येसाठी वापरण्यात आलेलं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही हत्या का करण्यात आली याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. नया नगर पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. या हत्येमागे वादाशिवाय इतर कोणते कारण आहे का, याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: