पुणे: इंदापूर (Indapur) तालुक्यातील बिडशिंग येथे जेवण बनवण्याच्या कारणावरुन एका शेतमजुराने दुसऱ्या शेतमजुराच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्याची (Crime) धक्कादायक घटना घडली आहे. शुभम लालजी भारतीय (वय 35 वर्ष) असं खून झालेल्या शेतमजूराचं नाव आहे. तर आरोपी नीरजकुमार कुशवाह याने जेवणाच्या वादावरुन दुसऱ्या मजुराची हत्या केली आहे.
नेमका कोणत्या कारणावरुन झाला वाद?
इंदापूर तालुक्यातील बेडशिंग येथे मिलिंद जीवनधर दोशी यांची बारा एकर जमीन आहे, यात फिर्यादी निलेश मारूती जांभळकर यांनी ही जमीन वाट्याने करायला घेतलेली आहे. या ठिकाणी शेतीत काम करण्यासाठी किसनकुमार रमेशकुमार कुशवाह, नीरजकुमार लालमनी कुशवाह, मनीष लालमनी कुशवाह आणि शुभम लालजी भारतीय हे उत्तर प्रदेशमधील कामगार या ठिकाणी काम करत होते.
शुक्रवारी दुपारी जेवण बनवण्यावरून नीरजकुमार कुशवाह आणि शुभम भारतीय यांच्यात वाद झाला होता. दरम्यान हा वाद जांभळकर यांनी मिटवला होता. त्यानंतर सायंकाळी रात्री उशिरा नेहमीप्रमाणे हे सर्वजण कामावरून घरी आले. त्यानंतर गावात सुरू असलेल्या मारुती महादेवाच्या मंदिरातील भंडाऱ्याचा त्यांनी आस्वाद घेतला. मात्र रात्री उशिरा साडेबारा वाजता घराच्या स्लॅपवर जांभळकर यांना जोरजोराने ओरडल्याचा आवाज आला. जांभळकर यांनी तात्काळ वरती जाऊन पाहिलं असता नीरजकुमार कुशवाह हा कोयत्याने शुभम भारतीय याच्यावरती वार करत होता. यानंतर जांभळकर यांनी इतर कामगारांच्या मदतीने जखमी झालेल्या शुभम भारतीय याला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलं, मात्र वैद्यकीय तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वी मृत झाल्याचं घोषित केलं.
पिंपरी चिंचवडमध्येही आठवडाभरापूर्वी घडला असाच काहीसा प्रकार
पिंपरी चिंचवडमध्ये 23 ऑगस्टला भरदिवसा सागर शिंदेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. फिल्मी स्टाईलने घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा अन् रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या हत्याकांड (Murder) प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. योगेश जगताप आणि हृषिकेश खरात अशी अटकेतील दोन आरोपींची नावं आहेत. मृत सागर शिंदे आणि दोघे मारेकरी एकाच वाहनातून जात असताना त्यांच्यात भिशीच्या पैशांवरुन वाद झाले आणि त्याचे पडसाद हत्येत उमटले.
23 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता औंध-रावेत बीआरटी मार्गावरील रक्षक चौकालगत ही धक्कादायक घटना घडली. गोळीबार झाल्यानंतर त्याच वाहनाने काही गाड्यांना धडकही दिली. दिवसा घडलेल्या घटनेने मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक भयभीत झाले. गोळीबाराचा आवाज आल्याने नागरिकांनी तिथून काढता पाय घेणं पसंत केलं. या घटनेची सांगवी पोलिसात नोंद करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरु केला. तपासादरम्यान योगेश जगताप आणि हृषिकेश खरात यांना अटक करण्यात आली. सागर शिंदे याच्या बंदुकीनेच त्याची हत्या करण्यात आल्याची कबुली या दोघांनी दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nagpur Crime: नागपुरात सुनेने केली सासूची हत्या; कौटुंबिक वाद पोहोचला शिगेला