मुंबई : कसबा पेठ आणि चिंचवड पोट निवडणुकीचा निकाल हाती (Pune Bypoll Election Results) आला आहे. यामध्ये कसबा पोटनिवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागला आहे, तर चिंचवड निकाल हा कसा बसा भाजपला (BJP) मिळवता आला आहे. गेल्या काही महिन्यात झालेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला हवं तसं यश मिळालेलं नाही. याला अनेक कारणे आहेत, या कारणांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपला अपयश का येतंय? यामागची काही महत्वाची करणे जाणून घेऊ...
अपयश पक्षातील अयोग्य नियोजनाअभावी आहे का?
कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अजिबात धक्कादायक वगैरे नाही. या निवडणुकीत काय होणार, याचा साधारण अंदाज आधीच आला होता. फक्त भाजपला यश मिळणार का नाही ते स्पष्ट बोलायला कोणी तयार नव्हतं, ते मात्र आज स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकारे गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला अपयश आले ते पक्षातील अयोग्य नियोजनाअभावी असे राजकीय वर्तुळत म्हटले जात आहे.
निर्णय बावनकुळे घेत नाहीत, यात होत होते हस्तक्षेप?
भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा संभाळल्यानंतर भाजपला अनेक चढ उतारांना सामोरे जावे लागले आहे. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका, शिक्षक पदवीधर विधानपरिषद, अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक, पुणे पोटनिवडणूक अशा निवडणुका पार पडल्या. त्यात मिळायला हवं तसं यश मिळालेलं पाहायला मिळत नाही. जरी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असले तरी प्रत्येक निर्णय बावनकुळे यांना घेता येत नाही, यात कोणाचातरी हस्तक्षेप असतो. त्यामुळे फ्री होल्ड निर्णय घेता येत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
बावनकुळेंवर अपयशाचे खापर ?
गेल्या काही निवडणुका झाल्या त्या प्रदेशाध्यक्ष या नात्याने बावनकुळेंच्या नेतृत्वात झाल्या असून भाजपला स्वतःचा गढ असलेल्या नागपूरची जागा राखता आला नाही. 5 जागांपैकी भाजपला केवळ 1 जागेवर विजय मिळाला असून भाजपला जबर धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नागपूरची जागा गेल्याचे अपयश चंद्रशेखर बावनकुळे यांचे असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. तर प्रदेशाध्यक्ष असूनही राज्यातील अनेक नेत्यांवर बावनकुळे यांचा होल्ड नाही, अशी देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तसेच बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असूनही त्यांना दुसरच कोणीतरी होल्ड करते आहे, अशी टीका विरोधक करत आहेत.
या निवडणुकीत प्लांनिंग फसली का?
आताच पार पडलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये भाजपने केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातले कॅबिनेट मंत्री, असे वरच्या फळीतले नेते प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. संपूर्ण शक्ती पणाला लावली मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हातात असलेली एक जागा ही गमावली. कसब्याची प्रतिष्ठेची असलेली जागा काँग्रेसच्या ताब्यात गेली. कसब्यात आणि चिंचवडमध्ये प्लांनिंग फसली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील कसबा आणि चिंचवडमध्ये ठाण मांडून होते. तरीही भाजपला मोठा धक्का सहन करावा लागल्यामुळे या पराभवाचे खापर आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि इतर नेत्यांवर ही फोडले जात आहे.
कार्यकर्त्यांमध्ये विश्लेषण करत टीकाटिप्पणी
या निवडणुकांच्या निकालानंतर भाजपतले कार्यकर्ते आपल्या आपल्या परीने विश्लेषण करत नेते मंडळींवर खापर फोडताना दिसतात. यामुळे भाजपातली अंतर्गत गट बाजी देखील पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियामध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. तसेच यापूर्वी नागपूरची पदवीधर विधान परिषदेची जागा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे गेली. तर पुण्याची जागा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे गेली अशी चर्चा सोशल मीडियावर आहे.
भाजपने लोकांना गृहीत धरल्यामुळे होतंय का?
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लागलेल्या निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने मतदारांना गृहीत धरले होते, त्यामुळे अपयशाला सामोरे जावं लागलं असं म्हटलं जातंय. देशात भाजपची लाट आहे, त्यामुळे राज्यात देखील याचा फायदा होईल, असं राज्यातील भाजप नेत्यांना वाटत होतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील घडामोडी राजकारण पाहता भाजप विरोधात प्रचार झालेला आहे. त्यामुळे भाजपला लोक नाकारत आहेत, असं विरोधक म्हणत आहेत. यामध्ये वाढती महागाई, शेतकरी आणि सर्वसामान्यांचे असलेले प्रश्न, उद्योग आणि रोजगार दुसऱ्या राज्यात चालला आहे. त्यामुळे भाजपवर लोक नाराज असल्याचं विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं आहे.
भाजप विरोधात महाविकास आघाडी खंबीर
भाजपला राज्यात प्रत्येक ठिकाणी पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी पक्षातील तिन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचच एक चांगलं उदाहरण शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणूक तसेच चिंचवड व कसबा पोटनिवडणुकीत पाहायला मिळालं. भाजपचा पराभव करण्यासाठी आणि भाजपची राज्यातील सत्ता घालवण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांशी समन्वय करून लढत आहेत. मात्र चिंचवडमध्ये जर राहुल कलाटे उमेदवार नसते तर तीही जागा भाजप गमावून बसली असती.