पुणे : जगभरासह देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसचा प्रकोप अद्यापही सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून जरी आकडे कमी झाले असले तरी अजून कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. कोरोना विरोधातील लढाईत सर्वात महत्वाचे शस्त्र आहे ते म्हणजे मास्क. मास्कमुळं या महामारीला रोखण्यात बरीच मदत झाली आहे. कोरोना महामारीनंतर आता औषध उत्पादक कंपन्या आणि मास्क निर्माण करणाऱ्या कंपन्या चांगल्यात चांगले मास्क करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. 


पुण्यात असलेल्या एक स्टार्ट अप कंपनीनं 3डी प्रिंटेट मास्क बनवला आहे. थिंकर टेक्नोलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं हा मास्क बनवला असून त्यांनी दावा केला आहे की, हा मास्क एन-95, 3-प्लाय आणि कपड्यापासून बनवलेल्या मास्कच्या तुलनेत अधिक सुरक्षा देऊ शकेल.  


अन्य मास्कच्या तुलनेत लोकांना चांगलं संरक्षण


कंपनीचे संस्थापक संचालक डॉ. शीतलकुमार झांबड यांनी म्हटलं आहे की, आम्ही कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात या मास्क बनवण्याच्या टेक्निकवर विचार करत होतो. आम्हाला त्यावेळी असं लक्षात आलं होतं की, मास्कच अशा संसर्गजन्य रोगांपासून लोकांना वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. मात्र आपल्याकडे अजूनही मास्क वापरणाऱ्या लोकांना चांगल्या प्रतीचे मास्क मिळत नसल्याचं दिसत आहे. यामुळं आम्ही चांगल्या प्रतीचे आणि परवडणाऱ्या दरात मास्क बनवण्याची तयारी केली. त्यांनी सांगितलं की, हे मास्क विषाणूनाशक तंत्रज्ञानानं बनवण्यात आले आहेत. जे अन्य मास्कच्या तुलनेत लोकांना चांगलं संरक्षण देतो.  


मास्कवर विषाणू नाशक कोटिंग


कंपनीच्या मते, मास्कवर केलेल्या विषाणू नाशक कोटिंगमुळं चाचणीत चांगले परिणाम समोर आले आहेत. यामध्ये कोविड 19 (SARS-COV-2) विरोधात चांगली सुरक्षा करण्याची ताकत आहे. मास्कच्या कोटिंगसाठी सोडियम ओलोफिन सल्फोनेट आधारित सामग्रीचा वापर केला आहे. हा मास्क पुनर्वापर करण्याजोगा आहे. या मास्कचा वापर आपण अनेक वेळा करु शकतो. या मास्कचे फिल्टर्स देखील 3-डी प्रिटिंगच्या वापरानं बनवले आहेत. या मास्कची विषाणू विरोधी क्षमता   95 टक्के असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. 


3-डी मास्कच्या पेटंटसाठी अर्ज केला


कंपनीचे संस्थापक संचालक डॉ. शीतलकुमार झांबड यांनी सांगितलं की, कंपनीनं  3-डी मास्कच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. तसेच हे मास्क विकण्यासाठी याचं उत्पादन देखील सुरु केलं आहे. आतापर्यंत या प्रकारचे 6 हजार मास्क का एनजीओ च्या माध्यमातून नंदुरबार, नाशिक आणि बंगळुरुच्या चार सरकारी दवाखान्यात वितरित केले आहेत.