पुणे/नवी दिल्ली : केंद्रीय माहिती-प्रसारण खात्याने आकाशवाणी पुणेचा प्रादेशिक वृत्तविभाग तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साहजिकच पुणेकरांमध्ये या निर्णयाविरोधात संतापाची लाट आहे.

 

मनसेनेही या निर्णयाविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. आश्चर्य म्हणजे पुणे आकाशवाणीच्या वृत्तविभागातील केवळ दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे हा बंदीचा घाट घातल्याचं समजतं.

 

पुणे आकाशवाणीचा वृत्तविभाग हा राज्यातील सर्वात जुना आणि मोठा विभाग आहे. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी काम करुन आकाशवाणीच्या बातमीपत्राची परंपराही जोपासली आहे.

 

आकाशवाणीवर सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी लागणाऱ्या प्रादेशिक बातम्या आजही खेड्यापाड्यात ऐकल्या जातात. हे बातमीपत्र पुणे आकाशवाणीच्या वृत्तविभागाद्वारेच तयार केलं जातं. त्यामुळे इतका मोठा वृत्तविभाग बंद करण्याआधी त्यावर साधी चर्चाही न झाल्याने अनेकांना हा निर्णय बुचकळ्यात टाकणारा आहे.