पुणे : पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची संरक्षक भिंत कोसळून 6 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.
आंबेगावात सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. सध्या याठिकाणी बचावकार्य सुरु आहे.
या दुर्घटनेमुळे बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांना कोणत्या परिस्थितीत राहावं लागतं, याचं विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. तीन इमारतींच्या मधे असलेल्या चिंचोळ्या जागेत हे मजूर त्यांच्या कुटुंबासह राहत होते.
दुर्घटना घडली त्यावेळी सुरुवातीला इमारतीत असलेल्या होस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी या मजुरांच्या मदतीला धावले. त्यामुळे काहींचे प्राण वाचवणे शक्य झाले.
मालाडमध्ये मध्यरात्री भिंत कोसळून 16 रहिवाशांचा मृत्यू
मुंबईतील मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून 16 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या याठिकाणी बचाव कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
VIDEO | मालाडमध्ये मध्यरात्री भिंत कोसळून 16 रहिवाशांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता
कोंढवा भिंत दुर्घटनेची पुनरावृत्ती
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा परिसरात सोसायटीची भिंत कोसळून 13 बांधकाम मजुरांचा आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला होता. बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या संरक्षण भिंती शेजारी मजुरांनी तात्पुरत्या झोपड्या उभारल्या होत्या, त्यावर भिंत कोसळली होती. मात्र पावसामुळे आणि शेजारी सुरु असलेल्या खोदकामामुळे सोसायटीची भिंत कोसळली होती.