उस्मानाबाद : लातूरमध्ये तूरडाळ 80 ते 85 रुपये किलो, पुण्यात 120 रुपये किलो आणि नवी मुंबईत 90 ते 100 रुपये किलो. तूरडाळीच्या किरकोळ दराबाबात तीन वेगवेगळ्या शहरातल्या तीन वेगवेगळ्या व्यापाऱ्यांनी दिलेली ही माहिती. या माहितीतल्या विरोधाभासामुळे, शहरातल्या व्यापाऱ्यांकडून ग्राहकांचा खिसा कापला जातोय हे अधोरेखित केलं आहे. डाळींची आवक सुरळीत आहे की कमी झाली आहे? डाळींचे दर खरंच वाढले आहेत की जाणूनबुजून वाढवण्यात आले आहेत? या प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी, आम्ही डाळींच्या पुरवठ्यासाठी प्रसिद्ध असलेली लातूर कृषी उत्पन्न समितीच्या व्यापाऱ्यांनाच विचारलं.

कांद्याच्या दरवाढीनंतर डाळींच्या किंमतीही वाढणार असल्याची माहित समोर येत होती. मात्र बाजारपेठेत बऱ्याच वेळेला जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जातात. खरंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाची आवक सुरु झाली की शेतमालाचे भाव पडायला सुरुवात होते, हा आजवरचा इतिहास आहे. राज्याच्या काही भागात दुष्काळ होता, तर यावर्षी त्याठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे उत्पादन घटून सर्व डाळींचे भाव वाढणार आहेत, असा प्रचार सुरु होता. प्रत्यक्षात डाळींचे दर वाढण्याची शक्यता फार कमी आहे. सध्या फक्त उडीद डाळ शंभरी पार गेली आहे. तुरीचे दर 95 रुपयांवरुन घसरुण 85 रुपयांवर आले आहेत.

तूर हातातून गेली म्हणून हिंगोली जिल्ह्यातल्या काही ठिकाणी शेतकरी तूर काढून टाकत आहेत. तुरीवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेंगा भरल्या नाहीत. हे चित्रं एकीकडे तर दुसरीकडे लातूर जिल्ह्याच्या काही भागात तुरीचं पीक उत्तम आलं आहे. लातूरची बाजार समिती ही डाळींसाठी देशात नंबर वन. इथल्या नितीन कलंत्रींचा तूरडाळींचा ब्रॅण्ड हा देशातला सर्वात मोठा ब्रॅण्ड आहे. नितीन यांच्याकडे 80 ते 82 रुपये किलो दराने तूर हवी तेवढी उपलब्ध आहे.

डाळी शंभरी पार, पावसाचा फटका बसल्याने येत्या काळात डाळींच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता

मागील सहा महिन्यापासून बाजारात हरभरा डाळ 55 ते 60 रुपये किलो, मसूर डाळ 55 ते 60 रुपये किलो, तूरडाळ 80 ते 85 रुपये किलो, मूगदाळ 90 रुपये किलो दराने मिळत आहे. फक्त उडीद डाळीने शंभरी ओलांडली आहे. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळी उडीद पेरायचा असतो त्यावेळी महाराष्ट्रात पाऊस नव्हता. मध्यप्रदेशात उडदाचा चांगला पेरा होता. पण तिथे अतिपाऊस झाला.

बाजारपेठेत बऱ्याच वेळेला गैरसमज पसरवले जातात. शेतकऱ्यांच्या शेतमालाची आवक सुरु झाली की शेतमालाचे भाव पडायला सुरुवात होते हा आजवरचा इतिहास. शेतकऱ्यांच्या नव्या तुरी, हरभरा बाजारात येणार आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणेच भाव पडले आहेत. पण त्या आधीच अतिवृष्टी झाली, उत्पादन घटलं म्हणून सर्व डाळींचे भाव वाढणार अशी नवी मुंबईत अफवा उठवण्यात आली आहे.

कांदा चार महिन्याचं पीक आहे. कांदा शेतात वाढण्याच्या काळात अतिवृष्टीने थैमान घातलं. म्हणून कांद्याने शंभरी पार केली. गृहिणींना कांद्यांचा भाव वाढल्याने डाळींचे भाव वाढले या आवईमुळे चिंता वाटू लागली आहे.

डाळ                लातूर घाऊक बाजार          पुणे किरकोळ बाजार          नवी मुंबई किरकोळ बाजार

हरभरा डाळ       रु. 55 ते 60/ किलो            रु. 100/ किलो                  रु. 80 ते 90/ किलो
 
तूर डाळ             रु. 80 ते 85/ किलो           रु. 120/ किलो                  रु. 90 ते 100/ किलो
                                                                    
मसूर डाळ          रु. 55 ते 60/ किलो           रु. 120/ किलो                   रु. 80 ते 90 /किलो

उडीद डाळ        रु. 100/ किलो                  रु. 160/ किलो                   रु. 120 ते 130/ किलो

मूग डाळ            रु. 90/ किलो                   रु. 120/ किलो                    रु. 100 ते 110/ किलो