शिक्षकी पेशाबद्दल व्हिडीओमध्ये वक्तव्य करताना इंदुरीकर महाराजांनी शिक्षकांची खिल्ली उडविल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. 35 मिनिटांच्या एका तासिकेमध्ये पाच मिनिटे शिक्षकांना वर्गात जायला लागतात. त्यानंतर फळा पुसण्यासाठी पुढची पाच मिनिटे शिक्षक घेतात. आदल्या दिवशी विषयाच्या तासिकेला काय झाले ? काय शिकलो त्याची रिव्हिजन करण्यामध्ये आणखी पाच मिनिटे शिक्षक घेत असल्याचे इंदुरीकर सांगतात. राहिलेल्या पुढच्या काही वेळात आपण उद्याच्या तासाला काय शिकणार हे सांगायलाही शिक्षक पाच मिनिटे घेत असल्याचे सांगत झाला तास सांगत शिक्षक तासिका आटोपती घेत असल्याचे इंदुरीकरांचे म्हणणे आहे.
स्वतः शिक्षक असणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या इंदुरीकर महाराजांकडून शिक्षकांसंदर्भातील खोचक टीकेच्या टिक टॉक वरील व्हिडीओमुळे शिक्षकांच्या व्हॉट्सअप समूहांमध्ये आश्चर्य तर व्यक्त होत आहेच. शिवाय ते टीकेचे धनी ही होत आहेत. यामुळे शिक्षकांची नोकरी कशी आरामदायी आणि बिनातापाची असल्याचे सांगत ते त्यांच्या कामाची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवीत आहेत.
सर्वात मोठे सेलिब्रिटी इंदुरीकर महाराज | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
इंदुरीकर महाराज हे स्वतः शिक्षक आहेत. शिक्षकांनीच शिक्षकांची प्रतिमा मलीन करू नये. त्यांच्या शैक्षणिक कामाबद्दल आदर आहे, त्यामुळे त्यांना मूल्यमापन करण्याचा नाद आहे. मात्र ते अनेकदा ते पूर्वतयारी न करता बोलून जातात, त्यामुळे पुढच्या वेळी अशा प्रकारचे वक्तव्य करू नये.
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, प्रबोधनाची मोठी परंपरा लाभली आहे. ज्यामध्ये सकारात्मक टीका केली जाते. मात्र, इंदुरीकर महाराजांनी ज्याप्रकारे शिक्षकांची खिल्ली उडवली आहे, ती बघून अनेक प्रामाणिक शिक्षक व्यथित झाले आहेत. अगदी खालच्या पातळीला जाऊन केलेली ही टीका पूर्णपणे अनाठायी वाटते. महाराज स्वतः शिक्षक म्हणून काही वर्षे कार्यरत होते. त्यांनी शिक्षकांचे प्रज्वलित करणारे काहीतरी प्रेरणादायी सांगायला हवे होते. मात्र त्यांच्या वक्तव्यातून शिक्षकांच्या नीतिधैर्याचं खच्चीकरणच होतंय, असं मत ऍक्टिव्ह टीचर्स फोरम, महाराष्ट्र संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केलं
कीर्तन म्हणजे सामाजिक प्रबोधनाचे माध्यम आहे. त्यांनी शिक्षकांवर कमेंट्स करण्यापेक्षा आणि त्यांच्या कामाची खिल्ली उडविण्यापेक्षा महाराजांनी समाज प्रबोधनाकडे लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरणारे यांनी मांडली. केवळ शिक्षकांना दोष देणे कितपत योग्य आहे? संत महात्मेही धन, लोभ याची अपेक्षा ठेवू नये असे सांगून घसघशीत मानधनावर अडून बसतात. एका शिक्षकावरून अथवा किर्तनकारावरून सर्व शिक्षकांना गृहित धरणे कितपत योग्य आहे? अशी प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कुलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराजांनी शिक्षकांची नाराजी आपल्यावर ओढून घेतली आहे.