होळी, धुलिवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास पुण्यात मनाई, नियम झुगारल्यास कारवाई


पुणे : 28 आणि 29 मार्चला होणाऱ्या होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा करण्यास पुण्यात मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, मोकळी मैदाने, शाळा त्याचबरोबर खाजगी जागेतही हा सण एकत्रित साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवर देखील हे सण साजरे करणं यावेळी टाळावे अशी सूचना करण्यात आली आहे.  


नियम झुगारल्यास कारवाई


होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी तुम्ही पर्यटनस्थळी येत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. कारण वाढत्या कोरोनाच्या अनुषंगाने लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळी निर्बंध घालण्यात आलेत. नियम झुगारल्यास कारवाई केली जाणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी तसे आदेश काढलेत. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण एकत्रित रित्या साजरे करता येणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, खाजगी मोकळ्या जागा आणि सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा इथं हे नियम लागू असतील.


कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने देशासह राज्य अनलॉकच्या दिशेने पावलं टाकू लागलं. पण कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने राज्यावर पुन्हा चिंतेचे ढग दाटू लागलेत. त्यामुळे महानगरांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने कठोर निर्बंध लावायला सुरुवात झाली आहे. अशातच होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीचे सण साजरे होणार आहेत. त्यामुळेच हे सण साजरे करण्यासाठी अनेकांच्या नजरा पर्यटनास्थळाकडे वळणार, तसे अनेकांनी नियोजन ही करायला सुरुवात केलीये. हे पाहता लोणावळ्यासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळी गर्दी होण्याची आणि प्रसंगी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊनच पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी निर्बंध घातलेत. होळी, धुळवड आणि रंगपंचमी हे सण एकत्रित येऊन साजरे केले जातात. हीच गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, खाजगी मोकळया जागा आणि सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागांमध्ये जमण्यास बंदी घातली आहे. नियम झुगारल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.


लॉकडाऊनमध्ये ही नियमांची पायमल्ली करत अनेक पर्यटक लोणावळ्यात वावरत होते. तसेच ख्रिसमस ते 31 डिसेंम्बर दरम्यान ही मावळ तालुक्यात नाईट कर्फ्यु लागू करण्यात आलं होतं. त्यावेळी ज्या पर्यटकांनी या नियमांचं उल्लंघन केलं होतं, त्यांना कारवाईला तोंड द्यावं लागलं होतं. त्यामुळे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी तुम्ही लोणावळ्यासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळी येणार असाल तर हजारदा विचार करा.