पंढरपूर : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना आता धनगर समाज आरक्षणासाठी पुन्हा एकदा राज्य सरकारवर दबाव आणणार आहे. यासाठी आता राष्ट्रीय नेते देखील मैदानात उतरणार आहेत. धनगर आरक्षण महामेळाव्यासाठी 11 ऑगस्ट रोजी पंढरपूरमध्ये प्रियांका गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थित राहणार आहेत. सध्या धनगर समाजातील अनेक नेते भाजपसोबत असल्याने आता हा समाज वंचितांच्या मागे न जाता आपल्यामागे यावा यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली असून आघाडीकडे असलेल्या धनगर नेत्यांनी पंढरपूरमध्ये बैठक घेत दोन लाख समाजाच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये महामेळावा घेण्याची घोषणा केली आहे.


काँग्रेसमधील धनगर समाजाचे आमदार रामहरी रुपनवर आणि राष्ट्रवादीकडे असलेले आण्णा डांगे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. धनगर समाजाला संविधानात दिल्याप्रमाणे अनुसूचित जमातीचे दाखले देण्यास फडणवीस सरकार विलंब करीत असल्याने त्यांच्यावरील नाराजी प्रकट करण्यासाठी हा मेळावा घेतल्याचे आ रुपनवर यांनी सांगितले.

या मेळाव्यास सर्व धनगर संघटना उपस्थित राहणार असल्याचा दावा करताना या मेळाव्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याना निमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे 9 ऑगस्ट पासून धनगर आरक्षण समन्वय समिती पंढरपूर मध्ये पाच लाख समाज बांधवांच्या उपस्थितीत आमरण उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा या संघटनेकडून यापूर्वीच करण्यात आली आहे.