शिर्डी : आयुष्यात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. कटू निर्णय असला तरी तो घ्यायची वेळ आली आहे. शरद पवारांच्या माध्यमातून मतदारसंघाचा मोठा विकास झाला.
खांद्याला खांदा लावून काम केलं. मात्र मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षात करणार प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार वैभव पिचड यांनी केली. अकोले येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.


यावेळी पिचड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला 32 हजाराचं मताधिक्य दिलं. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना विकास कामाला खिळ बसली. मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे आपणच सत्ताधारी पक्षात जावं ही जनतेची मागणी आहे. शरद पवारांचे उपकार मी कधीही फेडू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

पुन्हा आघाडीची सत्ता येणार नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्तेत असणं गरजेचं आहे. हा निर्णय घेणं खूप अवघड होतं.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे, असेही ते म्हणाले. आजवर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दिलेला सन्मान कधीही विसरू शकणार नाही. विकासाची गंगा मतदारसंघात आणण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.



राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ आणि वैभव पिचड 30 जुलैला भाजपात प्रवेश करणार

सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करून शरद पवार आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ आणि वैभव पिचड 30 जुलैला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या तीन दिवसात चित्रा वाघ आणि वैभव पिचड यांनी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे. याशिवाय काँग्रेसमधून कालिदास कोळंबकर, सुनील केदार, जयकुमार गोरे, गोपालदास अग्रवाल हे देखील भाजप प्रवेशासाठी रांगेत असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. वैभव पिचड अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या भेटीदरम्यान राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते.

मधुकर पिचड राष्ट्रवादीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असल्याने हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.  आमदार वैभव पिचड यांच्या भाजपा प्रवेशाच्या हालचालींना वेगाने सुरुवात झाली असून  अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे.