नवी दिल्ली : देशाच्या 16 व्या राष्ट्रपतीपदावर आता द्रौपदी मुर्मू विराजमान होणार आहे. राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्य आदिवासी महिला ठरल्या आहेत. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


राष्ट्राभिमान जागृत करणारा आनंदी क्षण
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्राभिमान जागृत करणारा हा आनंदी क्षण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "श्रीमती मुर्मू यांची निवड भारतीय महिला जगत तसेच आदिवासी समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानास्पद अशी आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी प्रखर राष्ट्राभिमान जागृत करणारा आनंदी क्षण आहे."


 






लोकशाहीचा विजय- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, "समाजातील अंतिम व्यक्तीला सर्वोच्च स्थानावर नेणार्‍या संविधानातील व्यवस्थेचे प्रत्यंतर! श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांचे मन:पूर्वक अभिनंदन! हा निर्णय घेणारे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि रालोआतील सर्व घटक पक्षांचेही अभिनंदन!"


 






राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केलं आहे. द्रौपदी मुर्मू यांना आपल्या शुभेच्छा असून त्यांच्या पुढील कारकीर्दीमध्ये त्यांना यश मिळावं अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. 


 






विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या शुभेच्छा
द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा देताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, "देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची झालेली निवड हा भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा, देशातील समस्त स्त्रीशक्तीचा गौरव आहे. पंधरा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या रुपानं देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती लाभल्या होत्या."